Mumbai Local Crime : धावत्या लोकलमध्ये मोबाईलसाठी प्रवाशावर चाकू हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आरोपी जोगिंदर सिंग लबानाला उल्हासनगरातून उचलले.
जोगिंदर सिंग अवतारसिंग लबाना (वय ३८, रा. उल्हासनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कल्याणच्या लोहमार्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. चौकशीदरम्यान लुटारूने अशा पद्धतीने शहरात अनेकांवर हल्ले करून त्यांना लुटल्याची कबुली दिली.
या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-खोपोली या धावत्या लोकलने नितेशकुमार शहा हे गुरुवारी दुपारच्या सुमारास प्रवास करत होते. याच लोकलमध्ये लुटारूने त्यांना लक्ष्य केले. मोबाईल हिसकावणाऱ्या लुटारूला नितेशकुमार यांनी जोरदार प्रतिकार केला. यावेळी आपण पकडले जाऊ या भीतीने लुटारूने झटापट करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर धारदार चाकू काढून नितेशकुमार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात प्रवासी नितेशकुमार यांच्या हाताला दुखापत झाली.
Mumbai Water Cut : मुंबईकरांना ‘El Nino’चा मोठा फटका; 1 मे पासून पाणी कपातीच्या निर्णयाची शक्यता, BMC चा प्लॅन काय?
या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. व्हायरल व्हिडिओच्या आधारे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल वाणी-पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेल्या हल्लेखोराचा कसोशीने शोध घेतला. एकीकडे जखमी नितेशकुमार शहा यांच्या फिर्यादीवरून अखेर हल्लेखोर जोगिंदर सिंग लबाना याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम ३०९(६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल वाणी-पाटील आणि त्यांच्या पथकाने या सराईत गुन्हेगाराला उल्हासनगर येथील राहत्या घरातून अटक केली.
केलेल्या तपासात आरोपी जोगिंदर सिंग लबाना हा उल्हासनगर परिसरातील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रेल्वे मार्गावरील हद्दीतदेखील त्याने अशा पद्धतीने आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचाही तपास करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले.
