• Sun. Jun 7th, 2026

    सत्यनारायण नुवाल, दक्ष खंते यांचे यश अत्यंत प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 26, 2026
    सत्यनारायण नुवाल, दक्ष खंते यांचे यश अत्यंत प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    भारताची सामर्थ्यवाढ ही जगाची गरज – केंद्रीय नितीन मंत्री गडकरी

    नागपूर, दि. २६ : खासगी क्षेत्राच्या माध्यमातून देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनाच्या क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान देणारे पद्मश्री सत्यनारायण नुवाल आणि तरुण पीढीचे आदर्श प्रतिनिधी ठरलेले दक्ष खंते या दोघांचेही यश आम्हा साऱ्यांसाठीच अत्यंत प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे बोलताना काढले.

    नाग भूषण अवॉर्ड फाउंडेशनच्या वतीने हॉटेल रेडिसन ब्लू येथील समिट सभागृहात आयोजित आयोजित नाग भूषण पुरस्कार-२०२५ समारंभात प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत तसेच अर्थ व नियोजन राज्यमंत्री अॅड. आशीष जयस्वाल यावेळी मंचावर उपस्थित होते. या समारंभात सोलर इंडस्ट्री इंडियाचे अध्यक्ष पद्मश्री सत्यनारायण नुवाल यांना प्रतिष्ठित अशा नाग भूषण पुरस्कार २०२५ ने, तर ‘आयरन मॅन ऑस्ट्रेलिया’स्पर्धेचे विजेते दक्ष खंते यांना युवा नाग भूषण पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते त्यांना हे सन्मान प्रदान करण्यात आले.

    याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अत्यंत विपरित, खडतर आणि आव्हानात्मक परिस्थितीत किती मोठे कार्य होऊ शकते आणि यशाचे शीखरही गाठता येते, याचे उदाहरणच सत्यनारायण नुवाल यांनी सर्वांपुढे घालून दिले आहे. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनाच्या क्षेत्रात खासगी क्षेत्र कितपत प्रगती साधेल, याची कुठलीही शाश्वती नसतानाच्या काळात नुवाल यांनी या क्षेत्रात पदार्पण केले आणि आता हा उद्योग यशाचे शीखर गाठतो आहे. जगातील सर्वोत्तम दर्जाची शस्त्रास्त्रेही भारत तयार करु शकतो, हे यानिमित्ताने आम्ही दाखवून दिले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्येही सोलर इंडस्ट्रीच्या योगदानाची अत्यंत मोलाची भूमिका राहिलेली आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

    दक्ष खंते हे भारताच्या नव्या पीढीचे आदर्श असे प्रतिनिधी असून त्यांनी साध्य केलेले यश हे अवर्णनीय आहे. आजच्या तरुण पीढीसाठी ते रोल मॉडेल आहेत. त्यांनी याचप्रकारे नव्या पीढीला प्रेरित करावे, अशी अपेक्षाही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

    भारताची सामर्थ्यवाढ ही जगाची गरज – केंद्रीय मंत्री गडकरी

    जगात शांतता नांदावी, सज्जनशक्तीचा प्रभाव कायम रहावा आणि दुर्जनशक्तींवर कायम अंकूश असावा, यासाठी भारताचे संरक्षण सामर्थ्य वाढणे अत्यंत आवश्यक असून त्यादृष्टीने देशात संरक्षण तंत्रज्ञानाचा विकास साधला जात आहे. या कार्यात संशोधन आणि निर्मितीच्या क्षेत्रात सोलर इंडस्ट्री अत्यंत मोलाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी बोलताना गडकरी यांनी सत्यनारायण नुवाल आणि दक्ष खंते या दोन्ही मानकऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. या दोघांचे आपापल्या क्षेत्रातील यश कायम इतरांना प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वासही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

    सत्यनारायण नुवाल आणि दक्ष खंते यांनी साध्य केलेली कामगिरी कायम इतरांना प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. कामगिरीतील सार्थकता ही त्यांच्या यशातील अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या दोन्ही मान्यवरांचा गौरव हा एकप्रकारे समाजाचाच गौरव आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. सत्काराला उत्तर देताना पद्मश्री सत्यनारायण नुवाल व दक्ष खंते या दोघांनीही आपल्या हृदय भावना व्यक्त केल्या. नाग भूषण फाउंडेशनचे अध्यक्ष अजय संचेती, कार्याध्यक्ष विलास काळे, फाउंडेशनचे सचिव निशांत गांधी यावेळी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमास मोठ्या संख्येने मान्यवर मंडळी उपस्थित होते. आगामी काळात नाग भूषण पुरस्कारांना देशव्यापी स्वरुप दिले जाणार असल्याची योजना यावेळी फाऊंडेशनच्या वतीने मांडण्यात आली.

    000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed