Bullet Train Project: मुंबईत बुलेट ट्रेनच्या स्थानकांसाठी रुळ बसवण्याचे काम सुरू आहे. जपनी शिंकान्सेन प्रणालीवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून हे काम सुरू आहे.
मजबूत काँक्रीटवर रुळ
बुलेट ट्रेन प्रकल्पात गुजरातपाठोपाठ राज्यातही कामे दिसू लागली आहेत. प्रकल्पातील एकूण ५०८पैकी ३४७ किमी ‘व्हायाडक्ट’ आणि ४३९ किमी पायाभूत सुविधांचे प्राथमिक काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर मुंबईत भुयारी बुलेट स्थानकासाठी स्लॅब कास्टिंगचे काम सुरू झाले आहे. रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी बॅलेस्टच्या मजबुतीकरणाकरीता खडीचा वापर केला जातो. बुलेट ट्रेनसाठी खडीऐवजी मजबूत काँक्रीटवर रुळ उभारणी केली जाते. यात चार महत्त्वाचे घटक आहेत. यामध्ये आरसी बेड, सिमेंट, ॲस्फाल्ट मॉर्टार आणि प्री-कास्ट स्लॅब यांचा समावेश आहे. त्याचबरोबर रुळांच्या जोडणीसाठी रेल फास्टनर्सचा वापर करण्यात येत आहे. यामुळे रेल्वेगाड्या वेगाने धावण्यास मदत मिळते. याला कमी देखभालीची गरज असल्याने कार्यक्षमतेतही वाढ होते.
Mumbai Local: लोकल ट्रेनचा विलंब आता विसरा! पाचव्या व सहाव्या मार्गिकेमुळे प्रवास सुस्साट; मध्य-पश्चिम रेल्वेवर विस्तार
आत्तापर्यंत १८५ किमीवर आरसी बेड तयार झाला असून १८८ किमीपर्यंत ट्रॅक स्लॅबची निर्मिती पूर्ण झाली आहे. यामध्ये ७० किमीवर स्लॅब बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. रुळ बसविण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे यांत्रिक पद्धतीने केली जाते. ‘फ्लॅश बट वेल्डिंग मशिन’द्वारे २५ मीटरचे रुळ जोडून २०० मीटरचे पॅनेल तयार केले जातात. रुळांची क्षमता ३२० किमी प्रतितास वेगासाठी आवश्यक तपासणीनंतरच निश्चित केली जाते. त्यानंतर रुळ बसवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
स्लॅब बसविण्यासाठी ‘स्लॅब लेइंग कार’, रुळ बसविण्यासाठी ‘रेल फीडर कार’ आणि ट्रॅकची अचूक पातळी राखण्यासाठी ‘सीएएम इंजेक्शन कार’चा वापर होत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पात आता प्रत्यक्ष रुळ बसविण्याच्या कामाला गती मिळाल्याने देशातील हाय-स्पीड रेल्वेच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे, असा विश्वास नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने (एनएचएसआरसीएल) व्यक्त केला. गुजरातमधील सूरत आणि आनंद येथे बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी लागणारे रुळांचे स्लॅब तयार करणारे अत्याधुनिक कारखाने उभारण्यात आले आहेत. हे स्लॅब तयार झाल्यानंतर विशेष ट्रेलरने बांधकामस्थळी (बेस) पोहोचवले जातात. सध्या सुरत-बिलीमोरा-वापी येथे चार आणि वडोदरा-आनंद-अहमदाबाद या ठिकाणी सहा असे एकूण १० बेस कार्यरत आहेत.
Konkan Railway: मे महिन्यात कोकणवासियांना मिळणार खास भेट! आठवड्यातून तीन दिवस दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू सेवा; कसं असेल वेळापत्रक ?
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रगती
- मुंबईतील भूमिगत स्थानकात स्लॅब कास्टिंगचे काम सुरू
- राज्यातील तीन बुलेट स्थानकांचे काम सुरू
- पालघर जिल्ह्यातील ७ पर्वतीय बोगद्यांपैकी २ बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण
- वांद्रे-कुर्ला संकुल-शिळफाटादरम्यानच्या २१ किमी बोगद्यांपैकी ५ किमी एनएटीएम पद्धतीने बोगदा खोदकाम पूर्ण
- एकूण ५०८ किमीपैकी ३४७ किमी व्हायाडक्ट आणि ४३९ किमी पायाभूत (पियर) काम पूर्ण
- १७ नदी पूल, ५ प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट पूल आणि १३ स्टील पूल पूर्ण
- २८६ किमी मार्गावर ५.७ लाखांहून अधिक नॉईज बॅरियर्स बसविण्यात आले
- ३७० ट्रॅक किमी (१८५ मार्ग किमी) आरसी ट्रॅक बेडचे बांधकाम पूर्ण
- सूरत आणि अहमदाबाद येथे बुलेट ट्रेन डेपोचे बांधकाम सुरू
- गुजरातमधील सर्व स्थानकांवरील सुपर स्ट्रक्चर काम प्रगत स्थितीत
