Nashik Case: अशोक खरात एका पेटीत नकली साप आणायचा व पूजेवेळी हातचलाखीने साप बाहेर काढून लोकांना चमत्कार भासवायचा, हे ‘कूक’ने स्वतः बघितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
बँकिंग लोन कन्सल्टन्ट ललित पोफळे (वय ४८, रा. वरळी) यांच्या फिर्यादीवरून संशयित खरातविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत खंडणी, फसवणूक, अंधश्रद्धा निर्मूलन अधिनियमान्वये गुन्हा नोंद आहे. सन २०१७ पासून एका व्यावसायिक मित्राद्वारे पोफळे हे खरातच्या संपर्कात आले. सन २०२४ मध्ये खरातने पोफळेंना ‘शक्तिपीठ महामार्ग’ एका विशिष्ट जमिनीतून जाणार असल्याचे सांगितले. महामार्गामुळे जमिनीचे भाव अनेक पटींनी वाढतील, असे आमिष दाखवत पोफळेंना जमीन खरेदी करण्यास भाग पाडले. पोफळेंनी पत्नीच्या नावे जमीन खरेदी केली; परंतु तेथून महामार्ग गेला नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोफळेंनी खरातसोबत केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांचे पुरावे दिले आहेत. तर मार्चमध्ये बँकिंग व आर्थिक क्षेत्रातील कामाच्या व्यापामुळे फिर्याद उशिरा दिल्याचेही पोफळेंनी स्पष्ट केले.
तिरुवनंतपूरममध्ये अंधारात पूजा
अशोक खरातने ‘शिवनिका संस्थान’चा संस्थापक आणि समुद्रशास्त्र, अंकशास्त्र व ज्योतिषशास्त्राचा जाणकार असल्याचे भासवले. हाताची मूठ बंद करून काजुकतलीचा प्रसाद निर्माण करण्याचा बनाव केला. आई-वडिलांच्या मृत्यूचा योग असल्याचे सांगत पोफळेंना भीती घातली. मृत्यूयोग टाळण्यासाठी ‘अवतारपूजा’ आणि ‘सिद्धपूजा’ करण्यास सांगितले. वावी व तिरुवनंतपूरम येथे अंधारात पूजा करताना बनावट नागाचा वापर करून तो नागदेवता असल्याचे भासवले.
फार्महाउसमध्ये कुकर्मांचे ‘स्टिंग’
खरात बंद फोनवर पोलिस अधिकाऱ्यांशी बोलण्याचे नाटक करून लोकांना प्रभावित करायचा, हे पोफळेंनी प्रत्यक्ष बघितले आहे. खरातने त्याच्या नाशिकमधील फार्महाउसवर जेवण बनवण्यासाठी स्वयंपाक्याची (कूक) गरज असल्याचे पोफळेंना सांगितले. खरातच्या कुकर्मांच्या संशयावरून पोफळेंनी त्यांच्या ओळखीतील एका तरुणाला कामाला लावले. खरातला संशय नको म्हणून त्या ‘कूक’चा पगार पोफळे स्वतः देत होते. ‘कूक’ने फार्महाउसवर खरातच्या कुकर्मांचे पुरावे संकलित केले. खरात जेव्हा पीडितांना फार्महाउसवर आणायचा तेव्हा ‘कूक’ला सर्व सीसीटीव्ही बंद करायला सांगायचा. खरात मंदिरात येणाऱ्या भाविकांना नागदेवता साक्षात दर्शन देतात, असा बनाव करायचा.
विश्वस्तपदावरून माघार
सन २०१९ मध्ये ‘तुम्ही सुशिक्षित आहात आणि तुमच्या मार्गदर्शनाची या संस्थेला गरज आहे’, असे सांगत पोफळेंना खरातने शिवनिका संस्थानाच्या विश्वस्त पदावर घेतले. खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांसह अघोरी कृत्ये समोर येत असताना पोफळे दूर झाले. खरातच्या कुकर्मांचा ‘पेन ड्राइव्ह’ पोफळेंना मिळाल्यानंतर ८ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांनी विश्वस्तपदाचा राजीनामा दिला. त्याची प्रत नाशिकच्या धर्मादाय आयुक्तांना पाठवली. पोफळे हे कधीच खरातचे किंवा शिवनिका संस्थानाचे ‘सीए’ नव्हते. खरातने त्याचे आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी प्रशांत पाळदे व किरण कटारिया या दोन ‘सीएं’ची नेमणूक केल्याचे फिर्यादीत स्पष्ट झाले.
‘पेन ड्राइव्ह’मध्ये व्हिडीओ
‘ऑफिस बॉय’च्या गर्भवती पत्नीवर खरातने लैंगिक शोषणाचा प्रयत्न केल्यावर त्याने कुकर्मांची ‘फाइल’ तयार करण्याचे ठरवले. त्याने कॅनडा कॉर्नरच्या कार्यालयात ‘स्पाय कॅमेरा’ लावून गैरकृत्यांचा ‘पेन ड्राइव्ह’ तयार केला. त्यासाठी उमकांत तावडे यांनी ‘ऑफिस बॉय’ला मदत केली होती. परब यांना ‘पेन ड्राइव्ह’बाबत माहिती मिळाली. परबांनी पोफळेंना सांगितल्यानंतर सर्वांनी ‘ऑफिस बॉय’ला पाठिंबा दिला. खरातच्या सर्व गैरकृत्यांचे पुरावे संकलित झाले. तावडेंनी ‘पेन ड्राइव्ह’मध्ये कुकर्मांचे व्हिडीओ भरले.‘पेन ड्राइव्ह’ त्यांच्या मित्रांमार्फत अशोक भालेराव नावाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला. त्यांनी शिर्डी पोलिसांना ‘पेन ड्राइव्ह’ दिल्याचे जासूद यांनी पोफळेंना सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
६ जुलै २०२४ रोजी अशोक खरात, पोफळे व दिनेश परब हे विमानाने तिरुवनंतपुरम येथे गेले. खरातच्या सांगण्यावरून आलिशान हॉटेलमध्ये मुक्कामाची व्यवस्था पोफळेंनी केली. ७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी सातला समुद्रकिनारी तिघे असताना खरातने डोळे मिटून गायत्री मंत्र म्हणायला सांगत समुद्रातून नाग येत असल्याचे भासवले. खरात मुंबईत यायचा तेव्हा त्याच्या सांगण्यावरून आलिशान हॉटेलमध्ये पोफळे राहण्याची व्यवस्था करायचे. खरातचे कुकर्म समोर आल्यावर त्याला कायदेशीर शिक्षा देण्यासाठी पोफळे, राजेंद्र जासूद व दिनेश परब यांची मुंबईत बैठक झाली. त्यानुसार जासूद व पोफळे यांची सरकारवाडा, तर परब यांची राहाता पोलिसांत खरातविरुद्ध फिर्याद दाखल आहे.
