ठाण्यात ज्ञानेश्वर नगरातील आरोग्य केंद्राचा वाद विकोपाला गेला. याच वादातून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे नगरसेवक समोरासमोर भिडले. दोन्ही गटाच्या जमावामध्ये हाणामारी, तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. अखेर वाद मिटवण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे : ठाण्यात संत ज्ञानेश्वर नगर भागात सार्वजनिक स्वच्छतागृह आणि नाल्याशेजारी शिवसेना नगरसेवकांच्या पाठपुराव्यातून होणाऱ्या आरोग्य केंद्राचा वाद गुरुवारी चिघळला. या ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या केंद्राचे लोखंडी कंटेनर दाखल होताच शिवसेना विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. दोन्ही बाजूचे कार्यकर्तेही भिडले. हाणामारीपर्यंत हा वाद गेल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे या भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ठाणे महापालिकेत शिवसेनेकडून (उबाठा) निवडून गेलेले एकमेव नगरसेवक असलेल्या शहाजी खुस्पे यांनी अवघ्या महिन्याभरापूर्वी या प्रभागातील सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या दुरावस्थेचा प्रश्न उघडकीस आणला होता. त्यानंतर याबाबत ठाणे पालिकेच्या सभागृहात अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान देखील खुस्पे यांनी प्रश्न उपस्थित केला.
स्वच्छतागृहाच्या दुरावस्थेचा प्रश्न चिघळलेला असतानाच त्याच्याच शेजारी असलेल्या नाल्याच्या बाजूला नागरी आरोग्य केंद्र उभारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. या ठिकाणी स्थानिक शिवसेना नगरसेवक अनिल भोर यांनी तीन आठवड्यांपूर्वी पाहणी करून आरोग्य केंद्रासाठी या जागेवर खडीकरणाचे काम सुरू केले. तसेच सिमेंट काँक्रिटीकरणही केले. मात्र या जागेवर पूर्वीप्रमाणे ‘नाना नानी’ पार्क व्हावे, तसेच प्रभागातील तरुणांना खेळण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खुस्पे यांनी केली. या मागणीला स्थानिक भाजप – मनसे पदाधिकार्यांनीही पाठिंबा देत येथे आरोग्य केंद्र उभारण्यास विरोध केला होता.
भाजपचे आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आरोग्य केंद्र अन्यत्र उभारण्याची सूचना दिल्या. तसेच अतिरिक्त निधी उपलब्ध करून येथील नाना-नानी पार्कच अद्ययावत करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र गुरुवारी या भागात अचानक आरोग्य केंद्राचे दोन कंटेनर आणले. हे कंटेनर पाहून स्थानिक नागरिक आणि खुस्पे यांनी विरोध केला. तसेच हे वाहन रोखून धरले.
आरोग्य केंद्राच्या समर्थनार्थ शिवसेनेचे नगरसेवक राम रेपाळे, अनिल भोर आणि माजी नगरसेवक अशोक वैती येथे दाखल झाले. तसेच उबाठाचे विभागप्रमुख अशोक जाधव, विनायक सुर्वे, महेश कदम, अमोल हिंगे या पदाधिकाऱ्यांनी विरोधासाठी प्रयत्न केले. दोन्ही बाजूचा जमाव काही काळ आक्रमक झाला. यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. जोरदार घोषणाबाजी सुरू असताना वाद हाणामारीपर्यंत विकोपाला गेला. घटनास्थळी परिमंडळ पाच पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी धाव घेत खुस्पे यांचीही समजूत काढली. शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नका, असेही आवाहन पोलिसांनी करताच जमावाने कंटेनरच्या वाहनाला रस्ता मोकळा करुन दिला.
आरोग्य सुधारण्यापेक्षा बिघडेल
आरोग्य केंद्राच्या शेजारी नाला वाहतो, तसेच सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडेल. गेल्या दहा वर्षांपासून ही जागा ओसाड होती. आता माझ्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडे येथील उद्यानासाठी पाठपुरावा केल्यानंतर काही मंडळींना जाग आली आहे. आरोग्य केंद्रासाठी येथे रस्त्याच्या कडेला जागा उपलब्ध असून आमचा या केंद्राला विरोध नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक शहाजी खुस्पे यांनी दिली.
२५ हजारांच्या लोकवस्तीला फायदा
“संत ज्ञानेश्वर नगर, डॉ. गंगाधर नगर, महात्मा फुले नगर, अंबिका नगर, राजीव गांधी नगर येथील रहिवाशांना नवीन आरोग्य सेवा केंद्रातून सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे 25 हजारांपेक्षा अधिक लोकवस्तीला त्याचा फायदा होणार असून या ओसाड, नशेबाजांचा विळखा असणाऱ्या जागेचा कायापालट होऊन आगामी दोन महिन्यात येथे नागरी आरोग्य केंद्र सुरू करण्याचा आमचा मानस आहे. त्यादृष्टीने आरोग्य केंद्राचे काम सुरू झाले आहे. आम्ही या केंद्राच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करून आवश्यक बाबींची पूर्तताही केली आहे”, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नगरसेवक अनिल भोर यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा