• Fri. Jun 19th, 2026

    व्यावसायिक वाहनचालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 23, 2026
    व्यावसायिक वाहनचालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    मुंबई, दि. २३ : रिक्षा, टॅक्सी तसेच ई-बाईक टॅक्सी सेवांमधील व्यावसायिक वाहनचालकांना प्रवाशांशी मराठीतून संवाद साधता यावा, यासाठी मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेशी निगडीत साहित्यिकांनी चालकांना व्यावहारिक मराठी शिकवण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

    परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात यासंदर्भात बैठक झाली. बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, मराठी भाषा विभागाचे उपसचिव नामदेव भोसले, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.शामकांत देवरे तसेच तज्ज्ञ, साहित्यिक उपस्थित होते.

    वाहनचालकांना खेळीमेळीच्या वातावरणात व्यावहारिक मराठी शिकविण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आपल्या ७२ शाखांमधून शिकवणी वर्ग सुरू करण्याची तयारी दर्शवित आहे. तसेच, मुंबई मराठी साहित्य संघाने आपल्या स्वयंसेवी शिक्षकांच्या माध्यमातून ऑनलाईन मराठी भाषा प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रशिक्षणासाठी चालकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

    ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधत संपूर्ण राज्यभर रिक्षा व टॅक्सी चालकांच्या परवान्यांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान इतर नियमांसोबतच चालकांना मराठी भाषेचे व्यवहारज्ञान आहे की नाही, याचीही पडताळणी केली जाणार आहे. वाहनचालकांमध्ये मराठी भाषेबद्दल आत्मीयता निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

    मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्षा उज्ज्वला मेहेंदळे तसेच ज्येष्ठ साहित्यिक महेश केळुसकर, संतोष राणे, अशोक बागवे, बाळ कांदळकर, सुनील तांबे, शिवाजी गावडे, सतीश सोळांकुरकर, अरुण म्हात्रे, एकनाथ आव्हाड, प्रसाद कुलकर्णी, प्राचार्य अशोक चिटणीस, ज्येष्ठ साहित्यिका अनुपमा उजगरे, दीपा ठाणेकर आणि मनीषा राजपूत आदींच्या मार्गदर्शनामुळे चालकांना मराठी भाषेचे व्यवहारज्ञान मोहिमेला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा परिवहन मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली.

    000

    संजय ओरके/विसंअ

    महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी व उदैती फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    24 ते 26 डब्यांच्या ट्रेन हाताळणार, सहा नवे प्लॅटफॉर्म, नवे प्रवेशद्वार; पुणे रेल्वे स्थानकात मोठे बदल होणार
    राज्यातील जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाचा अहवाल सहा महिन्यांत सादर करा – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed