• Sat. Jun 13th, 2026
    Amravati Crime: अयानची अचलपुरातून धिंड! परतवाडा शोषण प्रकरण, कडेकोट बंदोबस्तात मित्राच्या घरी नेऊन तपासणी

    Amravati Girls Assault Case: परतवाडा शोषण आणि आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. मुख्य आरोपी अयान व त्याच्या साथीदारांची पोलिस कोठडी २७ एप्रिलपर्यंत वाढवली आहे.

    परतवाडा शोषण प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, अमरावती: परतवाडा लैंगिक शोषण आणि आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याच्या साथीदारांची पोलिस कोठडी २७ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. बुधवारी अयानची अचलपूरच्या समरसपूरा ठाण्यात चौकशी करण्यात आली. त्यानंतर तपासाचा भाग म्हणून, अयान अहमदला कडेकोट बंदोबस्तात अचलपूर येथील त्याच्या एका मित्राच्या घरी नेण्यात आले. मुख्य रस्त्यावरून पायी नेत असताना आरोपी लंगडत चालल्याचे पाहून, परिसरात ‘थर्ड डिग्री’चा वापर झाल्याची चर्चा रंगली होती. मित्राच्या घरातून पोलिसांनी काही मोबाइल व डिजिटल साहित्य जप्त केले.

    डिजिटल पुराव्यांचा ‘खेळ’
    आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि मोबाइलमधील डेटा पूर्णपणे डिलिट करण्यात आला होता. मात्र, सायबर सेल आणि फॉरेन्सिक विभागाच्या मदतीने पोलिसांनी हा डेटा पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यात त्यांना बऱ्याच अंशी यशही आले असून, बुधवारी जप्त केलेले नवीन डिजिटल साहित्य तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठवले जाणार आहे. या उपकरणांतून प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    Maharashtra TimesAmravati Crime : पीडितेची आई पुढे, अमरावती शोषण प्रकरणाला नवीन वळण, 18 व्हिडिओ 39 फोटोंसह आक्षेपार्ह मजकुराचा खच
    वाहन आणि पिस्तुल जप्त
    आरोपी अयान अहमद याने सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या रीलमध्ये वापरण्यात आलेले महिंद्रा थार वाहन आणि दोन पिस्तुल (गन) हे सावळी दातुरा (ता. अचलपूर) येथील राजेश रोशन प्रजापती यांच्या मालकीचे असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी वाहन आणि दोन्ही शस्त्रे जप्त केली आहेत. पिस्तुलांचा व्यास सामान्य शस्त्रांपेक्षा कमी असल्याचे प्राथमिक निरीक्षणातून समोर आले आहे. ही शस्त्रे खरी आहेत की बनावट, हे तपासण्यासाठी ती आता तज्ज्ञांकडे पाठवण्यात येणार आहेत. आरोपीने ज्या मोबाइलद्वारे रील शूट केली होती, तो त्याने एका व्यक्तीला विकला होता. पोलिसांनी तो मोबाइल संबंधित व्यक्तीकडून हस्तगत केला आहे.

    उजेर खानवर दुसरा गुन्हा
    या प्रकरणाची व्याप्ती वाढत असतानाच, सहआरोपी उजेर खान इकबाल खान याच्यावर पोस्कोअंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिकवणी वर्गाला जाताना उजेर नेहमी मुलीची छेड काढत असे, असे तक्रारीत नमूद आहे.

    Maharashtra TimesAmravati Crime : अयानचा निर्लज्जपणा, पैशांसाठी कुटुंबालाही सोडलं नाही, आईच्या स्त्रीधनालाच हात घातला
    आरोपींची ११ बँक खाती सील
    या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याच्या सात साथीदारांचे जाळे उलगडण्यासाठी एसआयटी तपासाला गती देत आरोपींची ११ बँक खाती सील केली. या खात्यांतून झालेल्या आर्थिक व्यवहारांचा कसून तपास केला जात आहे. हे प्रकरण केवळ लैंगिक शोषणापुरते मर्यादित नसून त्याचे धागेदोरे पॉर्नोग्राफी रॅकेट पर्यंत पोहोचले असावेत, असा संशय पोलिसांना आहे. आरोपींच्या बँक खात्यांमधून झालेले आर्थिक व्यवहार हे प्रकरणाचे मुख्य केंद्र ठरले आहेत. या खात्यांतून अश्लील व्हिडीओंची विक्री करून पैसा कमावला जात होता का, याचा शोध पोलिस घेत आहेत. या तपासातून लवकरच काही मोठे चेहरे समोर येण्याची शक्यता आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा