• Wed. Jul 1st, 2026

    अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ३२ बालविवाह रोखले -मंत्री आदिती तटकरे यांची माहिती – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 21, 2026
    अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ३२ बालविवाह रोखले -मंत्री आदिती तटकरे यांची माहिती – महासंवाद

    महिला व बाल विकास विभागाच्या स्पेशल फोर्सची राज्यव्यापी धडक कारवाई

    मुंबई, दि. २१ : राज्यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभागाने ‘स्पेशल फोर्स’च्या माध्यमातून मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ३२ बालविवाह रोखण्यात यश मिळवले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे  यांनी दिली.

    बाल विवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ नुसार १८ वर्षांखालील मुलगी व २१ वर्षांखालील मुलाचा विवाह लावणे हा दंडनीय गुन्हा असून, बाल विवाह मुक्त राज्य बनविण्यासाठी महिला व बालविकास विभाग बाल विवाह मुक्त भारत हे अभियान राबवित असून, अतिशय कडक कारवाई करत राज्य देशात आघाडीवर आहे.

    अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काही भागांत पारंपरिक पद्धतीने अल्पवयीन बालकांचे विवाह लावण्याची प्रथा अद्यापही आढळून येते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने “बाल विवाह मुक्त भारत” या १०० दिवसांच्या अभियानांतर्गत व्यापक जनजागृती, समन्वय आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून यंत्रणा अधिक सजग केली आहे.

    मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की,  प्रकरण व्यवस्थापन, कुटुंबाचा सातत्याने पाठपुरावा, तसेच शिक्षण, कौशल्य विकास, समुपदेशन आणि पोषण सेवांशी समन्वय साधण्याचे काम या अभियानामार्फत राबविण्यात आले  होते.  यामध्ये कोकण विभाग (रायगड) – २ बालविवाह, पुणे विभाग (पालघर) – १, नाशिक विभाग – सांगली (१), नाशिक (२), अहिल्यानगर (५), छत्रपती संभाजीनगर विभाग – परभणी (१), लातूर (१), बीड (३), हिंगोली (१), धाराशिव (२), संभाजीनगर (४), बुलडाणा (१), अमरावती विभाग – अकोला (४), नागपूर विभाग – यवतमाळ (२), चंद्रपूर (२) असे एकूण ३२ बालविवाह रोखण्यात यश मिळाले.

    बालविवाह हा केवळ कायद्याचा भंग नसून बालकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे. बालविवाह रोखण्याबरोबरच संबंधित बालिकांच्या पुनर्वसन, शिक्षण आणि संरक्षणासाठीही ठोस पावले विभागामार्फत उचलली जात आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पालक व मध्यस्थांवर कारवाई सुरू असून, यापुढेही अशा घटना घडू नये यासाठी कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.

    या अभियानाच्या अनुषंगाने विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी, तज्ज्ञ प्रतिनिधी तसेच राज्यातील सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि चाइल्ड हेल्पलाइन प्रतिनिधी सहभागी झाले होते.

    0000

    श्रद्धा मेश्राम/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed