• Sun. Jun 14th, 2026

    Nitin Raut: नागपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला; नितीन राऊत नाराज, राजीनाम्याच्या चर्चांना उधाण

    Nitin Raut: नागपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला; नितीन राऊत नाराज, राजीनाम्याच्या चर्चांना उधाण

    Congress News: ‘देशातील सध्याच्या वातावरणात दलित आणि मुस्लिम समाजाने काँग्रेसला साथ दिली आहे. त्यामुळे त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे,’ असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

    नागपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला; नितीन राऊत नाराज, राजीनाम्याच्या चर्चांना उधाण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : नागपूर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार डॉ. नितीन राऊत यांनी या प्रक्रियेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यांच्या समर्थकाला संधी न दिल्याने पक्षात असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे राऊत राजीनामा देणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नागपूर महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य निवडीसाठी पक्षांतर्गत चर्चा सुरू होती. यामध्ये एक सदस्य राऊत गटाचा आणि एक शहराध्यक्ष विकास ठाकरे गटाचा असावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात दोन्ही उमेदवार शहराध्यक्षांच्या गटातूनच देण्यात आल्याने राऊत यांनी नाराजी व्यक्त केली.

    याबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. नितीन राऊत म्हणाले की, नागपूर मनपा आयुक्तांनी गेल्या आठवड्यात कोटा निश्चित केला होता आणि त्यानुसार अर्ज भरायचे होते. मात्र काल सकाळपर्यंत आम्हाला याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. मी प्रदेशाध्यक्षांना स्पष्टपणे सांगितले होते की, एक आमचा आणि एक त्यांचा सदस्य द्यायला हवा.

    राऊत यांनी पुढे सांगितले की, आमचा उमेदवार अर्ज भरायला गेला असता त्याला दाद देण्यात आली नाही. शेवटच्या क्षणी, अर्ज भरण्याची वेळ संपण्याआधीच काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. ही गोष्ट माझ्यासाठी नवीन नाही. यापूर्वीही अशा प्रकारे आमच्या गटाला डावलण्यात आले आहे. त्यांनी पक्षांतर्गत अन्यायाचा आरोप करताना म्हटले की, दलित समाजातील कार्यकर्त्यांकडे वारंवार दुर्लक्ष केलं जात आहे. एबी फॉर्म गायब करण्यासारख्या घटना घडत आहेत. हा फक्त माझा नाही, तर हा प्रदेशाध्यक्षांचाही अपमान आहे. स्थानिक स्तरावर हा छळ सुरू आहे, असे नितीन राऊत म्हणाले.

    राजीनाम्याच्या चर्चांबाबत विचारले असता राऊत यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही, मात्र त्यांनी इशाराही दिला. आम्हाला वेस्ट पेपरसारखे वापरू देणार नाही. आम्ही संघर्ष करणारे लोक आहोत आणि पुढेही लढत राहू, असे ते म्हणाले. उत्तर नागपूरला आजपर्यंत योग्य प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. २० जणांनी अर्ज भरले आहेत, मात्र उत्तर नागपूर आणि दलित समाजाला संधी देण्याबाबत गंभीर विचार व्हायला हवा, असे ते म्हणाले.

    दरम्यान, ‘नारी शक्ती अधिनियम’ आणि महिला आरक्षण विधेयकाबाबत बोलताना राऊत यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. “महिला आरक्षणासाठी काँग्रेसने सातत्याने प्रयत्न केले आहेत. संसदेत महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळायला हवे. तसेच एससी, एसटी आणि ओबीसी वर्गासाठीही आरक्षणाची तरतूद असावी, असे त्यांनी सांगितले. नागपूर काँग्रेसमधील या घडामोडींमुळे पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आले असून, आगामी काळात पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा