• Sun. Jun 14th, 2026
    Pune News : ऐन उन्हाळ्यात पुणेकरांवर पाणी संकट! खाजगी टँकर व्यावसायिकांचा आजपासून संप

    पुण्यात गुरुवारी (16 एप्रिल) शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची बातमी ताजी असतानाच आता पुणेकरांवर पाणी संकट गडद करणारी एक मोठी बातमी आहे. पुण्यात खाजगी टँकर व्यावसायिकांनी संप पुकारला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पुणेकरांवर पाणी संकट ओढावण्याची भीती आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : ऐन उन्हाळ्यात पुणे शहरातील खासगी वॉटर टँकर व्यावसायिकांनी आजपासून अनिश्चित काळासाठी संप पुकारला आहे. ‘टँकर माफिया’ असा ठपका ठामपणे फेटाळून लावत त्यांनी प्रशासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आम्ही सेवा देणारे आहोत, माफिया नाही”, असा स्पष्ट संदेश टँकर चालक आणि मालकांनी दिला. टँकर व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या परिस्थितीत तोट्यात सेवा देणे शक्य नसून, प्रत्येक ट्रिपमागे फक्त 500 ते 600 रुपये नफा उरतो. त्यात नव्या नियमांनुसार प्रत्येक टँकरसोबत हेल्पर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे प्रति ट्रिप सुमारे 1500 रुपयांचा अतिरिक्त खर्च वाढतो आहे. “खिशातून पैसे घालून सेवा देणे आता परवडणारे नाही,” अशी भूमिका त्यांनी घेतली.

    याशिवाय, आरटीओकडून गेल्या दोन महिन्यांपासून टँकर वाहनांचे पासिंग बंद असल्याची तक्रारही करण्यात आली आहे. सर्व कागदपत्रे पूर्ण असतानाही वाहनांना रस्त्यावर उतरू दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला. ट्रॅफिक पोलिसांकडून थेट टँकर जप्त केले जात असल्यामुळे व्यावसायिकांमध्ये असंतोष वाढला आहे.

    पाणीपुरवठ्याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पुण्यासाठी 14 टीएमसी पाणी मंजूर असताना प्रत्यक्ष वापर 22 टीएमसीपर्यंत होत असल्याचा आरोप करण्यात आला. नव्या सोसायट्यांना शाश्वत पाणीपुरवठ्याची व्यवस्था नसल्याने टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले. महापालिकेकडून अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळेच टँकरद्वारे नागरिकांना सेवा देत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

    कोविड काळातही टँकर चालकांनी अखंड सेवा दिल्याची आठवण करून देत, अपघातांच्या घटनांमध्ये चालकांनाच जबाबदार धरले जाते, असा आरोपही त्यांनी केला. “प्रत्येक दुर्घटनेला चालकाला दोष देणे योग्य नाही,” अशी प्रतिक्रिया खासगी वॉटर टँकर संघटनेकडून व्यक्त करण्यात आली.

    दरम्यान, या संपामुळे शहरातील अनेक भागांत पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता असून, नागरिकांना मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. प्रशासन आणि टँकर संघटना यांच्यात लवकर तोडगा निघतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

    पुण्यात गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार

    एकीकटे वॉटर टँकर चालकांनी संप पुकारला आहे. तर दुसरीकडे पुण्यात गुरुवारी (16 एप्रिल) पाणी पुरवठा बंद राहणार आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामानिमित्त संपूर्ण पुणे शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पुणे महापालिकेकडून देण्यात आला आहे. पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात बुधवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून गुरुवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पूर्ण 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, कात्रज, धनकवडी, आंबेगाव, कोंढवा, हडपसर, मुंढवा, मांजरी, फुरसुंगी, खराडी, चंदननगर, विमाननगर, विश्रांतवाडी, लोहगाव, कोथरूड, बावधन, वारजे, बाणेर, बालेवाडी, औंध, पाषाण, सुस रोड या भागांना फटका बसण्याची शक्यता आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा