• Sun. Jun 7th, 2026

    Pune Weather: पुण्यात तापमानाचा पारा वाढला! शहरात पुढील दोन दिवसांत वातावरण अधिक तापदायक होणार, IMD ने काय सल्ला दिला?

    Pune Weather: पुण्यात तापमानाचा पारा वाढला! शहरात पुढील दोन दिवसांत वातावरण अधिक तापदायक होणार, IMD ने काय सल्ला दिला?

    राज्यातील उच्चांकी तापमान ४४ अंश सेल्सिअस अकोला येथे आणि नीचांकी तापमान २० अंश सेल्सिअस पुण्यामध्ये नोंदविण्यात आले.

    heat wave(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्याच्या बहुतांश भागात भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असताना, पुण्यातही गेल्या दोन दिवसांत तापमानाचा पारा ४० अंशांजवळ रेंगाळला आहे, तर उपनगरात तापमान ४१ अंशांच्या पुढे पोहोचले आहे. उन्हाची वाढलेली तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला ‘आयएमडी’ने दिला आहे. पुढील दोन दिवसांत वातावरण अधिक तापदायक होणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला आहे.

    वातावरणातील प्रतिकूल बदलांमुळे चार दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. शहरात सकाळी दहापासूनच उन्हाची तीव्रता वाढून दुपारनंतर रस्त्यावरून फिरताना उन्हाचे चटके बसत आहेत. मंगळवारीही हेच चित्र कायम होते, एरव्ही सकाळी जाणवणारा गारठाही ओसरला होता. नऊनंतर ऊन वाढत गेले. मात्र, सरकारी सुट्टी असल्याने अनेकांनी कामाशिवाय घराबाहेर जाणे टाळले. त्यामुळे दुपारी रस्त्यांवर शांतता होती. संध्याकाळी ऊन ओसरल्यानंतरही हवेत उकाडा होता. मध्यवर्ती पुण्यापेक्षा उपनगरांमध्ये उन्हाची तीव्रता अधिक जाणवली. कमाल तापमानातही दोन ते तीन अंशांचा फरक होता. पुढील दोन दिवसांत तापमानातील वाढ कायम राहणार असून, रात्रीचा उकाडाही वाढण्याची शक्यता आहे.

    उष्णतेपासून बचावासाठी ‘एसओपी’

    मागील काही दिवसांपासून राज्यात उष्णतेचा कडाका प्रचंड वाढला आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर तापमानाचा पारा ४० अंशांपलिकडे गेला आहे. उष्णतेच्या या तडाख्यापासून नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी राज्य सरकारने तीन व्यापक मानक कार्यपद्धती (एसओपी) जारी केल्या आहेत. विशेषतः असंघटित कामगार, खाण कामगार आणि कमी उत्पन्न गटांतील नागरिकांचा यामध्ये प्राधान्याने विचार करण्यात आला आहे.

    पहिल्या ‘एसओपी’मध्ये रस्त्यावरील विक्रेते, बांधकाम मजूर, वाहतूक पोलिस, स्वच्छता कर्मचारी, डिलिव्हरी कामगार, रिक्षाचालक आदी बाहेर काम करणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाच्या येलो, ऑरेंज आणि रेड ॲलर्टनुसार कामाचे वेळापत्रक बदलणे, पाण्यासाठी विश्रांती, पाण्याचे बूथ, ओआरएस वितरण, सावलीची व्यवस्था आणि आरोग्य सुविधा मजबूत करणे यांसारख्या उपाययोजनांचा यात समावेश करण्यात याला आहे.

    दुसरी एसओपी चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी असून, यात उष्णतेच्या ताण व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. थंड विश्रांती केंद्रे, पाणीपुरवठा, वायूवीजन, कामाचे नियोजन, जॉब रोटेशन, उष्णतेसंबंधी आजार ओळखण्याचे प्रशिक्षण आणि महिला कामगारांसाठी विशेष सुविधा यांचा यामध्ये समावेश आहे. तिसऱ्या एसओपीमध्ये उष्णताप्रतिरोधक गृहनिर्माणाचा समावेश आहे. तत्काळ, मध्यम व दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांद्वारे घरांची थर्मल सुधारणा, थंड छप्पर, हरित क्षेत्रे आणि हवामान संवेदनशील नियोजन यावर यात भर देण्यात आला आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा