• Sat. Jun 13th, 2026
    Trimbakeshwar Temple : व्हीआयपी दर्शनाचा रेट तब्बल 12 हजार; भाविक रांगेत अन् लुटीचा मोठा डाव, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्ताला अटक, पुतण्यांच्या मदतीने चालवायचा रॅकेट

    Trimbakeshwar Temple VIP Darshan Scam : त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली सुरू असलेला काळाबाजार पोलिसांनी उघड केला आहे. देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांच्यानंतर आता त्यांच्या दोन पुतण्यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

    त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्ताला सात दिवसांची पोलीस कोठडी, आता पुतण्यांनाही अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, नाशिक: कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात ‘व्हीआयपी’ दर्शनाच्या नावाखाली सुरू असलेला ‘लुटीचा बाजार’ पोलिसांनी उघड करून मंदिराच्या एका विश्वस्ताला अटक केली आहे. संशयित पुरुषोत्तम कडलग या संशयिताला नाशिक जिल्हा न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे मंदिर परिसरातील भ्रष्टाचार उघड झाला असून, मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांची साखळी लवकरच स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत. त्र्यंबकेश्वर पोलिसांत दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात यापूर्वी एकजण अटकेत असताना पोलिसांनी संशयित विश्वस्त कडलग यालाही अटक करून मंगळवारी (दि. १४) नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश गावित यांनी तपासातील मुद्दे सांगितले. सहायक सरकारी अभियोक्ता जागृती ठाकरे यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला, तर ॲड. व्ही. एम. काळे यांनी कडलगची बाजू मांडली.

    फसवणुकीचा हा प्रकार अतिशय निंदनीय स्वरूपाचा असून, भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. कारण, ठराविक व्यक्तींना अतिरिक्त पैसे घेऊन जलद गतीने प्रवेश दिल्यामुळे कित्येक तास रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर अन्याय होत असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्यानुसार न्यायालयाने कडलगला २० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्याच्या तपासात भाविक आणि साक्षीदार दिनेश दीपक चालके (वय ४०, रा. विमाननगर, पुणे) यांचीही सहा हजार रुपयांना फसवणूक झाली होती. संशयित गोटीराम पेहरे याने जलद दर्शनासाठी हे पैसे घेत संशयित ओम कडलगमार्फत दर्शन करून दिले. त्याबाबत प्रवेशद्वारावरील रजिस्टरमध्ये कुणाल दीक्षित या नावाने बनावट नोंद केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.

    कारवाई राजकीय हेतूने?

    पैसे घेऊन दर्शन घडविल्याच्या प्रकरणात मंगळवारी (दि. १४) अटक करण्यात आलेले संशयित विश्वस्त पुरुषोत्तम कडलग हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश कार्याध्यक्ष आहेत. विविध प्रसंगी कडलग पक्षाच्या वतीने सत्ताधारी पक्षाविरूद्ध टीकाटिप्पणी करीत असत. कडलग यांनी नुकतीच भाजप अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांच्याबाबत कठोर शब्दात टीका केली होती. सातत्याने सरकारच्या ध्येयधोरणांबाबत टिप्पणी केल्याने कडलग यांना अडचणीत आणले जात असल्याचा दावा समाजमाध्यमांत सुरू आहे.

    Maharashtra TimesMumbai Water Supply Disrupted : मुंबईकरांवर जलसंकट! अर्ध्या तासाचा ‘पॉवर कट’ मुंबईकरांना भारी पडला; गिरगाव, खारसह अनेक भागात नळांना खडखडाट, पुरवठा सुरळीत कधी होणार?

    नाशिकच्या पंचवटीतील ४६ वर्षीय आनंदा सुरेश मेहेंदळे यांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित गोटीराम मनाजी पेहरे, अभिषेक कडलग, ओम कडलग आणि पुरुषोत्तम मधुकर कडलग या चौघांविरुद्ध गुन्हा नोंद आहे. त्यापैकी पेहरे हे १२ एप्रिलपासून पोलिस कोठडीत असून, पुरुषोत्तमला १४ एप्रिल रोजी पहाटे एक वाजता अटक झाली. मेहेंदळे व त्यांचे मित्र राकेश जगन्नाथ वाघ (रा. मखमलाबाद, पंचवटी) हे ११ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता त्र्यंबकेश्वर मंदिर ात दोनशे रुपये दराची अधिकृत देणगी देत दर्शन पास घेऊन रांगेत उभे होते. त्यावेळी पेहरे याने त्यांना भेटून ‘तुम्हाला दहा मिनिटांत व्हीआयपी दर्शन करून देतो. तुम्ही घेतलेल्या दर्शन पासमुळे चार-पाच तास लागतील. मी तुम्हाला तीन हजार रुपयांत व्हीआयपी दर्शन करून देतो’, असे सांगितले. त्यानंतर अभिषेकच्या मदतीने फिर्यादी व त्यांच्या मित्राला मंदिरात दर्शन करून देत बाहेर येताच तीन हजार रुपये रक्कम घेतली. त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टची अधिकृत शुल्क आकारण्याबाबत कुठलीही सुविधा नसताना, कोणतीही पावती न देता ही फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

    गुन्ह्याची कार्यपद्धती

    दर्शन रांगेत ताटकळत उभ्या भाविकांसोबत मध्यस्थ संपर्क साधत जलद दर्शनासाठी किंमत निश्चित करतात. त्यानंतर मध्यस्थ हे संशयित पुरुषोत्तम कडलग, अभिषेक कडलग, ओम कडलग यांच्याशी संपर्क साधत भाविकांना त्यांच्यासोबत मंदिरात पाठवतात. प्रत्येक भाविकाकडून पाच, तीन, दोन हजार याप्रमाणे पैसे घेत असत.

    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar Crime : माझ्या प्रमिलाला विष देऊन संपवलं! लग्नानंतर चार वर्षांत लेकीचा संशयास्पद मृत्यू, वडिलांचा टाहो, दोन चिमुकले आईविना पोरके झाले

    पोलिसांचे ‘स्टिंग ऑपरेशन’

    त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची लूट होण्यासह मारहाणीचे प्रकार नवे नाहीत. यापूर्वीदेखील त्यामुळे मोठे वादंग उद्भवले असून, गत महिन्यात एका महिला भाविकाला मारहाण झाल्याने न्यायालयीन चौकशी सुरू झाली. तत्कालीन प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीशांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यातच दर्शनाच्या रांगेत भाविकांची फसवणूक होत असल्याची तक्रार पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यापर्यंत पोहोचली होती. त्यांनी एक विशेष पथक तयार करून ‘स्टिंग ऑपरेशन’चे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी मंदिर परिसरात भाविकांच्या वेशात सापळा रचून फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध तांत्रिक पुरावे संकलित केले. त्यातून दर्शनासाठी भाविकांकडून तीन ते बारा हजार रुपये उकळणे, विश्वस्तांच्या अधिकाराचा गैरवापर करून मंदिराचा ‘पूर्व दरवाजा’ उघडणे, शंभर ते दीडशे भाविकांना बेकायदेशीरपणे मंदिरात सोडल्याचे समोर आले.

    पोलिस कोठडीची कारणे (रिमांड रिपोर्टनुसार…)

    • एका दिवसात फक्त अर्ध्या तासात चार भाविकांची नऊ हजार रुपयांची फसवणूक
    • मंदिरात नियमित हजारो भाविक येतात. अनेकांची फसवणूक झाल्याचा संशय; त्या रकमेतून लाखो रुपयांची उलाढाल
    • बऱ्याच कालावधीपासून हा प्रकार सुरू. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे साक्षीदाराच्या जबाबातून निष्पन्न,
    • भाविकांच्या फसवणुकीतील मुख्य सूत्रधार पुरुषोत्तम कडलग असून, टोळीत आणखी साथीदार आहेत का, याचा तपास सुरू
    • आतापर्यंत फसवणुकीची रक्कम नऊ हजारांपैकी आठ हजार रुपये हस्तगत करणे शिल्लक
    • फसवणुकीतून मिळणाऱ्या रकमेत संशयितांच्या लाभाचे प्रमाण किती टक्के, याचा तपास सुरू
    • चारही संशयितांची एकत्रित चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडी आवश्यक

    Maharashtra TimesAmravati Crime : 180 मुलींना जाळ्यात ओढून 350 आक्षेपार्ह व्हिडिओ, तरुणाला बेड्या; देहव्यापारासाठी ब्लॅकमेल केल्याचं समोर

    दोन्ही पुतण्यांना अटक

    दरम्यान, आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असतानाच, आता संशयित आरोपी पुरुषोत्तम कडलग यांच्या दोन्ही पुतण्यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अभिषेक कडलग आणि ओम कडलग अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून, त्यांना काल रात्री ताब्यात घेण्यात आले. पुतण्यांच्या मध्यस्थीनेच पुरुषोत्तम कडलग हे दर्शनाच्या काळाबाजाराचे रॅकेट चालवत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. कडलग यांचे हे दोन्ही पुतणे एजंटकडून पैसे घ्यायचे आणि पुरुषोत्तम यांना फोन करून भाविकांच्या ‘व्हीआयपी’ दर्शनाची व्यवस्था करून द्यायचे. अशा प्रकारे हा दर्शनाचा काळाबाजार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा