• Sun. Jun 7th, 2026

    Pune News: कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाला दिलासा! दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा मार्ग; पहिला टप्पा जूनपर्यंत पूर्ण

    Pune News: कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाला दिलासा! दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा मार्ग; पहिला टप्पा जूनपर्यंत पूर्ण

    Katraj Kondhwa Road: पुण्यात सोलापूर-पुणे महामार्ग आणि कोल्हापूर-पुणे-मुंबई बायपासला जोडणाऱ्या कात्रज-कोंढवा मार्गाचं रुंदीकरण अनेक वर्षांपासून रखडलं होतं. या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून वाहतूककोंडी होते.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, पुणे: गेल्या दशकभरापासून रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला मोठा दिलासा मिळाला असून, राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने अंतिम निवाडा प्रस्तावास मंजुरी दिली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    शहरातील दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा आणि जड वाहतुकीचा मोठा ताण सहन करणारा हा मार्ग दीर्घकाळ भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे प्रलंबित होता. मात्र, महापालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समन्वयातून तयार करण्यात आलेला भूसंपादन प्रस्ताव मंत्रालयातील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मंजूर झाला. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

    Maharashtra TimesPune Airport: पुणे विमानतळावरून तीन नव्या शहरांसाठी सेवा, मे महिन्यापासून विस्तार; पुण्याहून तिरुपतीला जाणं सोपं होणार

    अधिकाऱ्यांचा पाठपुरावा

    महापालिका आयुक्त नवलकिशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या रस्त्यासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. उच्चस्तरीय समितीने अंतिम निवाडा प्रस्तावास मंजुरी दिली असून, आता सरकारची औपचारिक मान्यता मिळताच प्रत्यक्ष जागा ताब्यात घेऊन रस्ता कामाला सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया महापालिका आयुक्त राम यांनी व्यक्त केली.

    …या कामांचा समावेश

    कात्रज-कोंढवा रस्ता विकास आराखड्यात ८४ मीटर रुंदीचा आहे. पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा मार्ग विकसित केला जाणार आहे असून, साडेतीन किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी १२९ मिळकतींमधील सुमारे ५२ हजार ६३० चौरस मीटर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. या टप्प्यात मुख्य रस्ता, दोन्ही बाजूंना सेवा रस्ते, पावसाळी वाहिनी; तसेच माऊलीनगर येथे ग्रेड सेपरेटरचा समावेश असणार आहे.

    उड्डाणपुलाच्या कामालाही गती येणार

    दरम्यान, राजस चौक येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत (एनएचएआय) उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामालाही या प्रकल्पामुळे चालना मिळणार आहे. पुलाच्या उतारासाठी आवश्यक असलेले सुमारे ४०० मीटर सर्व्हिस रस्त्यांचे काम सुरू असून, त्यातील काही भाग पूर्ण झाला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कात्रज-कोंढवा मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन जड वाहतुकीस सुरक्षित आणि सुलभ पर्याय उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    Maharashtra TimesMumbai-Pune Missing Link: युद्धाचा फटका ‘मिसिंग लिंक’ला, केबल-स्टेड पुलाचं डांबरीकरण रखडलं; पुन्हा विलंबाची शक्यता

    सध्या, कात्रज-कोंढवा मार्गावर ताशी १५,००० हून अधिक वाहने प्रवास करतात. यामध्ये अवजड वाहनांचे प्रमाण जास्त आहे. पीएमआर रिंग रोड आणि प्रमुख बायपाससारखे पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे बोपदेव घाट आणि दिवे घाटातून येणाऱ्या वाहनांची वाहतूक या मार्गावरून मोठ्या प्रमाणात होते. हा प्रकल्प दोन टप्प्यात नियोजित आहे. पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा मार्ग तयार केला जाणार आहे. हे काम जून २०२६पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, अंतिम विकास आराखड्यात ८४ मीटर रुंदीच्या मार्गाचा प्रस्ताव आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा