• Sat. Sep 5th, 2026

खाकीतील माणुसकी आणि कर्तृत्वाचा ‘भरोसा’ -API तेजश्री शिंदे यांची प्रेरणादायी यशोगाथा – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Apr 13, 2026
खाकीतील माणुसकी आणि कर्तृत्वाचा ‘भरोसा’ -API तेजश्री शिंदे यांची प्रेरणादायी यशोगाथा – महासंवाद

मीरा-भाईंदर: पोलीस दलात कर्तव्य बजावताना केवळ गुन्हेगारांना जरब बसवणे इतकेच मर्यादित न राहता, समाजातील पीडित महिला आणि बालकांसाठी आशेचा किरण ठरणारी एक व्यक्तिमत्त्व म्हणजे मीरा-भाईंदर वसई विरार (MBVV) पोलीस आयुक्तालयातील साहाय्यक पोलीस निरीक्षक (API) तेजश्री शिंदे. केंद्र आणि राज्य शासनाच्या “महिला सक्षमीकरण” मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, तेजश्री शिंदे यांनी पोलीस दलाच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याचा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आणि दिशादर्शक आहे.

केवळ गुन्ह्याचा तपास करणे हे ध्येय न ठेवता, भविष्यातील गुन्हे रोखण्यासाठी त्यांनी जनजागृतीवर भर दिला. त्यांच्या ‘कायद्याचे धडे’ या अनोख्या उपक्रमांतर्गत त्यांनी 45 पेक्षा जास्त शाळांमध्ये ७५ हून अधिक सत्रे घेतली आहेत. या माध्यमातून तब्बल २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची आणि सुरक्षिततेची जाणीव करून दिली. त्यांच्या याच कार्याची दखल घेत २०२३ मध्ये त्यांना UNICEF (United Nations Children’s Fund) आणि राज्य बालहक्क संरक्षण आयोगाकडून प्रतिष्ठित ‘बाल स्नेही पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे.

तेजश्री शिंदे यांच्या कार्याची व्याप्ती केवळ स्थानिक मर्यादेत राहिली नाही. कौटुंबिक हिंसाचार आणि मानवी शोषणाला बळी पडलेल्या महिलांच्या मदतीसाठी त्या ढाल बनून उभ्या ठाकल्या. दुबई, कुवेत आणि आफ्रिकन देशांमध्ये अडकलेल्या भारतीय महिलांची अवघ्या २४ तासांत सुटका करण्यात त्यांनी बजावलेली भूमिका त्यांच्यातील तत्परता आणि आंतरराष्ट्रीय समन्वय कौशल्याचे दर्शन घडवते.

सध्या मीरा-भाईंदर येथील ‘भरोसा सेल’मध्ये कार्यरत असताना त्यांनी अनेक विखुरलेली कुटुंबे पुन्हा उभी केली आहेत. त्यांच्याकडे येणाऱ्या कौटुंबिक वादाच्या प्रकरणांमध्ये त्यांनी ६१% इतका उल्लेखनीय ‘रिझॉल्व्ह रेट’ (यशस्वी निराकरण दर) प्राप्त केला आहे. कायद्याचा धाक आणि समुपदेशनाची जोड यामुळे अनेक संसार पुन्हा आनंदाने सुरू झाले आहेत.

पोलीस अधिकारी म्हणून कठोर कर्तव्य बजावतानाच तेजश्री शिंदे यांनी आपल्यातील संवेदनशीलता साहित्याच्या माध्यमातून जपली आहे. त्या एक उत्कृष्ट कवयित्री आणि लेखिका आहेत. नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणाऱ्या पहिल्या ‘महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात’ त्यांची काव्यवाचनासाठी झालेली निवड ही महाराष्ट्र पोलीस दलासाठी अभिमानास्पद बाब आहे.

तेजश्री शिंदे यांची ही यशोगाथा केवळ एका पोलीस अधिकाऱ्याची कामगिरी नसून, ती जिद्द, चिकाटी आणि संवेदनशीलतेचा संगम आहे. “महिला सक्षमीकरण” मोहिमे अंतर्गत त्यांचे नाव आज अनेक गरजू महिलांसाठी आणि तरुण मुलींसाठी प्रेरणास्थान बनले आहे. खाकी वर्दीतील ही ‘तेजस्विनी’ खऱ्या अर्थाने समाजाचे रक्षण आणि सक्षमीकरण करत आहे.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed