• Wed. Jun 17th, 2026

    Nagpur Crime : संसारासाठी खूप त्रास सहन केला, पण हळूहळू सना पूर्णपणे खचली; लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांत जीवन संपवलं, सुखी आयुष्याची आस अधुरीच राहिली

    Nagpur Crime : संसारासाठी खूप त्रास सहन केला, पण हळूहळू सना पूर्णपणे खचली; लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांत जीवन संपवलं, सुखी आयुष्याची आस अधुरीच राहिली

    Nagpur Crime News : लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच हुंड्यासाठी सुरू झालेल्या छळाला कंटाळून २६ वर्षीय सना खान हिने टोकाचं पाऊल उचललं. गणेशपेठ पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाने सध्या नागपूरात एकच खळबळ उडाली आहे.

    नागपुरातील गणेशपेठ परिसरात नवविवाहितेची जीवन संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक सासरच्या मंडळींच्या वागण्यात झालेल्या बदलामुळे एका २६ वर्षीय नवविवाहितेला आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याची धक्कादायक घटना नागपुरातील गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. हुंड्याच्या नावाखाली पैशांची मागणी आणि त्यातून सुरू झालेला छळ यामुळे ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला असून पोलिसांनी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    सना अंजुम अकील खान ऊर्फ सना अंजुम शेख (वय २६, रा. गंजीपेठ) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह २०२४ साली शोएब ऊर्फ सैफ अयूब खान (वय ३०) याच्यासोबत झाला होता. सुरुवातीच्या काळात संसार व्यवस्थित सुरू असल्याचे दिसत होते. मात्र काही महिन्यांतच परिस्थिती बदलली आणि सना हिला माहेरून पैसे आणण्याचा दबाव टाकला जाऊ लागल्याची माहिती पुढे आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पतीसह, सासरे, सासू आणि नणंद यांनी सनाकडे वारंवार पैशांची मागणी केली. या मागण्या पूर्ण न झाल्यास तिला मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागत होते. घरातील वातावरण तणावपूर्ण बनत गेले आणि सना हळूहळू मानसिकदृष्ट्या खचत गेली. सततच्या टोमण्यांमुळे आणि अत्याचारामुळे तिच्यावर मोठा मानसिक ताण निर्माण झाला होता. कुटुंबातील या बदललेल्या वागणुकीमुळे आणि अपेक्षांच्या ओझ्यामुळे सना पूर्णपणे एकटी पडल्याची भावना निर्माण झाली होती.

    Maharashtra TimesArvind Sawant : ‘उद्धवजींनी माझं कौतुक केलं, बैठकीत ऑपरेशन टायगर असा विषय नव्हता’; मातोश्रीतील बैठकीनंतर खासदार अरविंद सावंत काय म्हणाले?

    तिने अनेकदा हा त्रास सहन करत संसार टिकवण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थितीत काहीच सुधारणा झाली नाही. अखेर या सर्व त्रासाला कंटाळून तिने ७ एप्रिल रोजी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

    घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, नवविवाहित महिलांवर होणाऱ्या दबावाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. सनाच्या नातेवाईकांनी तिच्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गणेशपेठ पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसेच हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यांतर्गत पती, सासरे, सासू आणि नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक नीलम घोडके करत असून आरोपींची चौकशी सुरू आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा