Shivsena News: एकीकडे ऑपरेशन टायगरबाबत विविध बातम्या येत असताना आता स्वत: एकनाथ शिंदे यांनी हे वृत्त फेटाळून लावल्याने या चर्चा थांबणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ८ खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. विविध माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिल्यानंतर दोन्ही शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडत या सर्व चर्चा फेटाळून लावल्या असून माझी उद्धव ठाकरेंच्या पक्षातील कोणत्याही खासदारासोबत बैठक झाली नसल्याचा दावा केला आहे.
शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’बाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्यानंतर आणि काही प्रसारमाध्यमांनी ठाण्यात याबाबत बैठक झाली असल्याचा दावा केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही,” असं शिंदे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, “उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु, या बातम्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. ती केवळ अफवा असून सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणे माध्यमांनी टाळले पाहिजे,” असं आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे.
नेमका दावा काय?
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दुसऱ्यांदा मोठी फूट पडणार असल्याचा दावा काही माध्यमांकडून करण्यात आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई वगळता इतर ८ खासदारांची बुधवारी रात्री ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याचं सांगण्यात आलं आहे. या बैठकीला ८ पैकी ६ खासदार प्रत्यक्ष तर दोन खासदार व्हिडिओ कॉलवरून उपस्थित होते, असाही दावा करण्यात आला. विशेष म्हणजे उपस्थित असलेल्या ६ खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी तयार असल्याचं सांगत एका पत्रावर सही केल्याचंही सदर वृत्तांमध्ये नमूद करण्यात आलं होतं.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी जरी ठाकरेंच्या खासदारांबाबतच्या चर्चा फेटाळून लावल्या असल्या तरी याबाबत आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा