• Fri. Jul 3rd, 2026

    ना. म. जोशी मराठी शाळेत उद्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व’ अभियानांतर्गत समाधान शिबिर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 9, 2026
    ना. म. जोशी मराठी शाळेत उद्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व’ अभियानांतर्गत समाधान शिबिर – महासंवाद

    मुंबई, दि.९ : राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत शुक्रवार  दि. १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता बृहन्मुंबई म.न.पा. मराठी शाळा क्र.२, ना.म. जोशी मार्ग, लोअर परेल मोनोरेल स्टेशनजवळ, मुंबई येथील शिवडी विधानसभा निवडणूक कार्यालय, तळ व पहिला मजला येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विद्यार्थी, महिला, दिव्यांग तसेच उपस्थित नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे अर्ज भरून त्याची तिथेच पूर्तता करण्यात येऊन दाखले वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहरचे अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

    शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांच्या तक्रारीचे स्थानिक पातळीवरच निवारण व्हावे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या शिबिराचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास पालकमंत्री, महापौर आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

    शिबिरातील प्रमुख उपक्रम

    या शिबिरात महसूल विभागासह महाराष्ट्र शासनाच्या इतर विविध विभागांचे अंदाजे ४० स्टॉल्स लावण्यात येणार असून यामध्ये उत्पन्न दाखला, तात्पूरता रहिवास दाखला, जेष्ठ नागरिक दाखला, जातीचा दाखला, अधिवास दाखला, आर्थिक दृष्ट्या मागासवर्ग प्रमाणपत्र आणि नॉन-क्रिमिलेअर दाखल्यांचे जागेवरच वाटप करण्यात येणार आहे.

    शिधा पत्रिकाः नवीन शिधा पत्रिका मिळवणे, नाव कमी करणे किंवा वाढवणे याबाबतचे अर्ज स्वीकारून कार्यवाही, तसेच लाभार्थीना शिधा वाटप करणे.

    योजनांची माहिती : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती व नोंदणी करणे.

    आधार कार्डः आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी विशेष कक्षाची व्यवस्था.

    कामगार विभाग, महिला व बाल कल्यान विभाग, समाज कल्यान विभाग, टपाल विभाग, विधी व न्याय विभाग, शिक्षण विभाग, आर्थिक विकास महामंडळ, नशाबंदी महामंडळ अशा विविध विभागांमार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांबद्दलची माहिती देण्यात येणार आहे.

    नागरिकांनी परिपूर्ण सादर केलेल्या अर्जावर एकाच दिवसात दाखले देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. इयत्ता १० वी व इयत्ता १२ च्या विद्यार्थ्यांना प्राथमिकता देण्यात येऊन या शिबिरांचे सर्वांकरिता अयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये संजयगांधी निराधार योजने अंतर्गत मिळणारे लाभ तसेच भूमापन व भूमि अभिलेख अंतर्गत मिळणाऱ्या सेवांचा सुध्दा समावेश करण्यात येणार असून इतर विभागांशी सुध्दा समन्वयाव्दारे विविध सेवांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed