• Fri. Jul 3rd, 2026

    पुन्हा एकदा राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा

    ByMH LIVE NEWS

    Apr 9, 2026
    पुन्हा एकदा राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा

    मुंबई

    राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सतत हजेरी लावताना दिसला. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. गेल्या आठ दिवसांपेक्षाही अधिक काळापासून अवकाळी बरसताना दिसत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंब्याचेही नुकसान झाले. दरम्यान गेल्या अनेक दिवसानंतर राज्यातून अवकाळीचे ढग कमी झाले आहेत. मात्र, काही भागात आजही पावसाचा इशारा देण्यात आला. आज राज्यातील तापमानात चढउतार बघायला मिळेल. दक्षिण महाराष्ट्रात आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. कोकणातही उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे राज्यात अनेक भागात उकाडा वाढल्याचे बघायला मिळेल. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद महाबळेश्वर येथे झाली. महाबळेश्वर येथे नीचांकी 16.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. लातूर, सांगली, धाराशिव येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

    लातूर, सांगली आणि धाराशिव येथे सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे मोठे नुकसान झाले. मात्र, पूर्णपणे पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. धुळे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटी आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील तब्बल 25000 शेतकऱ्यांचे 14831 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले. यात प्रामुख्याने मका आणि कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.

    एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे तब्बल 18 हजार 687 शेतकऱ्यांचे 11,627 हेक्टर वरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यात गहू आणि हरभरासोबत कांदा पिकाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याचा अहवाल शासनाला पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक सुरज जगताप यांनी दिली.

    द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. द्राक्ष काढणीच्या अंतिम टप्प्यात आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे द्राक्षांची प्रतवारी घसरली असून त्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे प्रतवारी घसरल्याने द्राक्षांच्या दरात तब्बल 40 टक्क्यांची घसरण झाली असून द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed