धाराशिव जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या हद्दीतील 712 ग्रामपंचायतींमध्ये संध्याकाळी सात वाजता भोंगा वाजेल आणि तिथून पुढचे दोन तास सर्व गावांमध्ये टीव्ही आणि मोबाईल बंद राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यासाठी मोठी बातमी समोर येत आहे. धाराशिव जिल्हा परिषदेच्या हद्दीदीतील सर्व गावांमध्ये संध्याकाळी दोन तास टीव्ही आणि मोबाईल बंद राहणार आहेत. मुलांच्या शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय धाराशिव जिल्हा परिषदेने घेतला आहे. मोबाईल, टीव्ही या वस्तू मनोरंजनाच्या आहेत. पण प्रत्येक जण या वस्तूंच्या आहारी गेलेला बघायला मिळतो. विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यांचा यामध्ये जास्त समावेश आपल्याला बघायला मिळतो. पण यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतो. त्यामुळे मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी. त्यांचा कल अभ्यासाकडे वळावा यासाठी धाराशिव जिल्हा परिषदेने सर्व गावांमध्ये संध्याकाळी दोन तास टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संध्याकाळी सात वाजता ग्रामपंचायत कार्यालयातून भोंगा वाजेल. त्यानंतर पुढचे दोन तास गावात टीव्ही आणि मोबाईलवर बंदी येईल. तसेच सरकारी कर्माचाऱ्यांकडून याबाबत गावात पाळत ठेवली जाईल, अशी देखील माहिती समोर येत आहे.
जिल्हा परिषदेने नेमका काय निर्णय घेतला?
धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी जिल्हा परिषदेने हा मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या हद्दीतील गावांमध्ये दररोज संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील 712 ग्रामपंचायतींमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लावणं आणि स्क्रिन टाईम कमी करणं हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याची माहिती अर्चना पाटील यांनी दिली आहे.
अर्चना पाटील काय म्हणाल्या?
“ग्रामपंचायतींमधून संध्याकाळी 7 वाजता भोंगा वाजला जाईल. 7 ते 9 या वाजेदरम्यान सर्व शाळांमधील टीव्ही बंद राहतील. आम्ही आमचे 750 शासकीय कर्मचारी प्रत्येक गावात नियुक्त करतोय. ते कर्मचारी गावांमध्ये सात ते नऊ या वेळेत टीव्ही आणि मोबाईल बंद राहतील याची खबरदारी घेण्याची जबाबदारी घेतील”, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी दिली.
दरम्यान, हा निर्णय तसा अभिनव उपक्रम आहे. याबाबत सर्वसामान्य जनता काय विचार करते? ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. धाराशिव जिल्ह्यांतील सर्व गावांमधील नागरीक मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या या निर्णयाचं स्वागत करतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा