• Wed. Jun 17th, 2026
    Ashok Kharat याचा आणखी एक कारनामा उघड, पतसंस्थेतील अनेक खात्यांचा खरात नॉमिनी, पोलीस चौकशीत काय खुलासा?

    भोंदूबाबा अशोक खरात याच्याबाबत रोज नवनवीन खुलासा होताना दिसत आहेत. अशोक खरात याने समता आणि जगदंबा पतसंस्थेत अनेक बनावट खाते उघडल्याचे समोर आले आहे. या खात्यांचा नॉमिनी हा खरात असल्याचं पोलीस तपासात समोर येत आहे. याच प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीनंतर खरातच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता दिसत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मोबीन खान, अहिल्यानगर : शिर्डीतील जमीन गैरव्यवहार आणि सावकारी प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. भोंदूबाबा अशोक खरातच्या संबंधित समता आणि जगदंबा पतसंस्थेत अनेक बनावट खाते असल्याचे समोर आले. समता नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. कालच खरातच्या संबंधित १०० खात्यांपैकी अनेक खात्यांना अशोक खरात वारस असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणातील संशयित आरोपी अशोक खरात याने इतरांच्या नावे बनावट खाती उघडून व्यवहार केल्याचा संशय बळावला आहे.

    खातेदार असलेले नामकरण आवारे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे मोठी खळबळ उडाली आहे. “ओळखपत्र आमचे असले तरी आम्ही कधीही खाते उघडले नाही किंवा त्यावर कोणतीही सही केली नाही,” असा स्पष्ट दावा आवारे यांनी केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

    पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, समता पतसंस्थेतून नामकरण आवारे यांच्या नावे असलेल्या दोन खात्यांमधून २०२१ पासून आतापर्यंत तब्बल १ कोटी २० लाखांचे व्यवहार झाले आहेत. मात्र, या व्यवहारांबाबत आवारे यांनी पूर्णपणे अनभिज्ञता दर्शवली आहे. पोलिसांनी घेतलेल्या जबाबात आवारे यांनी सांगितले की, संबंधित खात्यांवर आमची सही नाही. खाते उघडण्यासाठी आम्ही कधीही पतसंस्थेत गेलो नाहीत. केवळ आमची ओळखपत्राचा वापर करून ही खाती कार्यान्वित करण्यात आली असावीत असेही त्यांनी सांगितली. विशेष म्हणजे, या खात्यांवर आरोपी अशोक खरात हा ‘नॉमिनी’ (वारसदार) म्हणून नोंदवलेला असून, मोबाईल नंबरही खरातचाच वापरण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

    तपासाचा घेरा वाढला, चाकणकर परिवारावरही संशय

    या प्रकरणाची व्याप्ती केवळ आवारे कुटुंबापुरती मर्यादित नसून, आरोपी खरातने इतरही अनेक पतसंस्थांमध्ये अशाच प्रकारे व्यवहार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आवारे कुटुंबातील सदस्यांच्या नावे ६ हून अधिक खाती असल्याचे समोर आले आहे. समता पतसंस्थेतील खात्यांना अशोक खरात नॉमिनी आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या बहीण नात्यातील इतर नावे असलेल्या खात्यांमध्येही अशोक खरात नॉमिनी असल्याची पोलिसांना दाट शंका असून, त्या दिशेने तपास सुरू आहे.

    आरोपीला समोर बसवून होणार चौकशी

    गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणातील अटकेत असलेल्या दोन्ही आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांची पोलीस कोठडी शुक्रवारी संपल्याने त्यांना राहाता न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने दोघांना आणखी तीन दिवसांची वाढ केली आहे.

    खरात समोर होणार खातेदारांची चौकशी

    “जेव्हा खरातला तपास यंत्रणा तपासासाठी शिर्डीत आणतील, तेव्हा पतसंस्थेमधील संबंधित खातेदारांना आणि अशोक खरातला समोरासमोर बसवून सखोल चौकशी केली जाईल,” अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. इतर पतसंस्थांमध्येही खरातने अशाच प्रकारचे ‘नॉमिनी’ म्हणून व्यवहार केले आहेत का? याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत. या मोठ्या आर्थिक व्यवहारामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा