• Sun. Aug 9th, 2026

    Pune Crime: आई गावी गेलीय; आधी माऊलीला संपवलं, नंतर बॉडी तशीच ठेवून घराला कुलूप ठोकलं; अखेर फुटलं पुण्यातील घटनेचं बिंग!

    पुणे : दारूच्या व्यसनाने एका कुटुंबाचा कसा भयानक शेवट होऊ शकतो, याची अंगावर काटा आणणारी घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात उघडकीस आली आहे. दारू पिण्यासाठी आईने पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या मुलाने लोखंडी रॉडने वार करून जन्मदात्या आईचीच निर्घृण हत्या केली आहे. भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्यातील म्हाळवडी गावात हा धक्कादायक प्रकार घडला असून पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. बेबी काळू मालुसरे (वय ५२) असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी आईचे नाव आहे. तर, समीर काळू मालुसरे (वय ३१) असे या आरोपी मुलाचे नाव आहे.

    भोरचे पोलीस उपाधीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळवडी गावात राहणारा समीर मालुसरे याला दारूचे व्यसन होते. घटनेच्या दिवशी समीरने दारू पिण्यासाठी आपल्या आईकडे पैशांची मागणी केली. मात्र, आई बेबी मालुसरे यांनी त्याला पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. याच कारणावरून मायलेकांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. दारूच्या नशेत आणि पैशांच्या रागात असलेल्या समीरने घरातील एक लोखंडी रॉड उचलला आणि आईच्या डोक्यात व तोंडावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने बेबी मालुसरे यांचा जागीच मृत्यू झाला.

    आईचा मृत्यू झाल्याचे पाहिल्यानंतर आरोपी समीरने अत्यंत थंड डोक्याने पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला. त्याने आईचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह घरातच ठेवला आणि घराला बाहेरून कुलूप लावून तो निघून गेला. शेजाऱ्यांनी विचारपूस केली असता, “आई गावाला गेली आहे,” अशी खोटी माहिती त्याने दिली. मात्र, काही तासांनंतर तो पुन्हा घराजवळ आला आणि त्यानेच आई घरात असल्याची कबुली दिली. संशय आल्याने स्थानिकांनी घराची पाहणी केली असता, महिलेचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने भोर पोलिसांशी साधला.

    घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपी मुलगा समीर मालुसरे याला बेड्या ठोकल्या. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस दत्तात्रय जाधव, विशाल मोरे, दीपक गायकवाड आणि हेमंत भिलारे हे करत आहेत.