• Sun. Sep 20th, 2026
माझ्या नातीला सांभाळा, शेजाऱ्यांकडे चिमुरडीला सोपवून आजी ड्युटीवर; सकाळी दोघी मृतावस्थेत, आळंदीतून दुसरा नवरा ताब्यात

Pune Alandi Double Murder : हा खून चोरीच्या उद्देशाने झाला नसल्याचे पोलिस तपासात समोर आले असून मृत लहान मुलीच्या आजीच्या दुसऱ्या पतीने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : आळंदीजवळील केळगाव येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेसह सहा वर्षांच्या चिमुकलीचा राहत्या घरात धारदार हत्याराने वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना गुरुवारी समोर आली आहे. या घटनेने आळंदी परिसर हादरून गेला आहे. हा खून चोरीच्या उद्देशाने झाला नसल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे खुनामागील गूढ वाढले आहे.

दरम्यान, मृत लहान मुलीच्या आजीच्या दुसऱ्या पतीने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. धनश्री केदारी (वय सहा) आणि मंगल शिंदे (वय ७०, रा. ठाकरवाडी, केळगाव) अशी मृतांची नावे आहेत. संगीता दत्तात्रेय केदारी (वय ४१) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

काय आहे प्रकरण?

संगीता यांचा मुलगा आणि सून त्यांच्या समवेत राहत नाहीत. धनश्री ही संगीता यांच्या मुलाची मुलगी होती. लहानपणापासून ती संगीता यांच्यासमवेत राहत होती. संगीता या खासगी रुग्णालयात हाउस-कीपिंगचे काम करतात. मंगल शिंदे या संगीता यांच्या शेजारी एकट्याच राहत असत. बुधवारी रात्री संगीता या रात्रपाळीसाठी कामावर गेल्या होत्या. जाताना त्यांनी शेजारी राहणाऱ्या मंगल यांना नातीसोबत झोपायला सांगितले होते.
Maharashtra TimesPune Rains : वीस वर्षांची सावलीच ‘काळ’ बनून आली… पुण्यात पावसामुळे झाड कोसळलं, आडोशाला बसणाऱ्या फूल विक्रेतीचा करुण अंत

त्या दिवशी काय घडलं?

गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास संगीता नेहमीप्रमाणे कामावरून घरी आल्या. त्या सुरुवातीला मंगल यांच्या घरी गेल्या. मात्र, त्यांच्या दरवाजाला कुलूप होते. त्यामुळे त्या आपल्या घरी आल्या. बंद दरवाजा त्यांनी ढकलला असता घरात मंगल व धनश्री या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या. त्यांनी बाहेर येऊन आरडाओरडा केला. हा प्रकार आळंदी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Ambadas Danve यांची जिल्हा परिषदेत भूमिका भाजपच्या बाजूनं, डोणगावकरांनी सगळंच सांगतिलं

Maharashtra TimesKalyan Crime : प्रवासात ओळख वाढवली; कल्याणमध्ये तिघा रिक्षा चालकांचा महिलेवर सामूहिक अत्याचार, पार्टीला बोलवून कुकर्म

आजीचा दुसरा नवरा ताब्यात

हल्लेखोराने रात्रीच्या वेळी घरात घुसून धनश्री आणि मंगल शिंदे यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे समोर आले आहे. घरातील कोणताही ऐवज चोरीला गेलेला नाही. त्यामुळे हा खून चोरीच्या उद्देशाने झाला नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या फॉरेन्सिक पथकाला; तसेच श्वान पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने आरोपीचा मागोवा घेतला जात आहे. आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. गुरुवारी रात्री पोलिसांनी फिर्यादी संगीता यांच्या दुसऱ्या पतीला ताब्यात घेतले आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा