• Sun. Jun 7th, 2026

    NCP Politics: प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे पदच्युत? राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या पत्राने वाद, पदांचा उल्लेख नाही

    NCP Politics: प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे पदच्युत? राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या पत्राने वाद, पदांचा उल्लेख नाही

    NCP Politics: सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या पत्राने ‘राष्ट्रवादी’तील राजकीय भूकंपांच्या मालिकेतील नवा भूकंप झाल्याचे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे.

    प्रफुल्ल पटेल सुनेत्रा पवार सुनील तटकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्षपदावरून सुनील तटकरे यांना हटविण्यात आले किंवा कसे, या प्रश्नामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे वादळ सुरू झाले असून, सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दहा मार्च रोजी दिलेल्या पत्रात त्या स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष व शिवाजीराव गर्जे खजिनदार ही दोनच पदे पेनाने नमूद करण्यात आली आहेत. त्यामुळे पटेल व तटकरे समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, यातून पक्षात नवी फूट पडते की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

    सुनेत्रा पवार यांनी २६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर त्याविषयीची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यासाठी सादर केलेल्या पत्रात पटेल आणि तटकरे यांच्या नावापुढे त्यांचे पदच लिहिलेले नसल्याने या दाव्याला बळ मिळत असल्याचे बोलले जात आहे. दहा मार्च रोजी आयोगाला सादर केलेल्या पत्रात सुनेत्रा पवार या अध्यक्ष, तर शिवाजीराव गर्जे हे कोषाध्यक्ष म्हणून नमूद आहे. पटेल आणि तटकरे यांच्या नावापुढे पदच लिहिण्यात आलेले नाही. याच पत्रात पवार यांनी २८ जानेवारीनंतर त्यांनी दिलेल्या पत्रापर्यंत करण्यात आलेला कुठलाही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, असेही अधोरेखित केले आहे.

    Ritu Tawade यांचं ‘ते’ विधान, घशाची समस्या नाहीशी, राऊतांकडून टीका, महापौर काय म्हणाल्या?

    सुनेत्रा पवार यांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार पवार यांच्या निवडीवर आयोगाने शिक्कामोर्तब केल्याने हा प्रश्न निकालात निघाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या या पत्रात पक्षाचे पदाधिकारी व शिखर समितीत त्यांच्या व्यतिरिक्त प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, चेतन तुपे, माणिकराव कोकाटे, शेखर निकम, सुबोध मोहिते, शिवाजीराव गर्जे, सरोज अहिरे, सना मलिक, जय अजित पवार व धीरज शर्मा आहेत. यात प्रफुल्ल पटेल व तटकरे यांचा एकही कट्टर समर्थक नाही. धीरज शर्मा कोणाच्या पारड्यात आयत्यावेळी वजन टाकतील याची शाश्वती पक्षात कोणालाही नाही; तसेच छगन भुजबळ हेदेखील प्रसंगी सुनेत्रा पवार यांच्याच पारड्यात वजन टाकू शकतात. उर्वरित सर्व सदस्य हे सुनेत्रा पवार यांच्याच मर्जीतले असल्याने पक्षावर त्यांची पूर्ण पकड आल्याचे बोलले जाते.

    सूत्रांच्या म्हणण्यानुसार या पत्राची जी प्रत आज रोहित पवार यांच्यापाशी आहे, ती निवडणूक आयोगाने पोच दिलेली प्रत असून, ती प्रत सुनेत्रा पवार यांच्याच खास मर्जीतील लोकांशिवाय त्यांच्याकडे पोहोचू शकत नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जवळ जात आहेत किंवा कसे, असाही एक संभ्रम पक्षात अनेकांना सतावत आहे.

    Maharashtra TimesMaharashtra Cabinet Decisions : साकळाई योजनेला 1,234 कोटी, दिव्यांगांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय
    ‘राष्ट्रवादी’तील नवा भूकंप
    अजित पवार यांच्या अपघाती निधनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उठलेली वादळे शमण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. पवार यांच्या मृत्यूनंतर त्याच दिवशी दोन्ही ‘राष्ट्रवादी’च्या विलिनीकरणाबाबत जोरदार दावे-प्रतिदावे करण्यात येत होते. शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’तील जवळपास सर्व नेते दोन्ही पक्षांचे विलीनकरण व्हावे ही अजित पवार यांची इच्छा होती, त्यासाठी वारंवार बैठका झाल्याचे सांगत होते. मात्र, दुसरीकडे अशा प्रकारच्या बैठकींची कुठलीच माहिती दादांनी दिली नसल्याचे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे सांगत होते.

    पटेल यांच्या पत्रावरूनच ठिणगी
    या वादामागे प्रफुल्ल पटेल यांनी १६ फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला दिलेले एक पत्र असल्याचे बोलले जाते. या पत्राची प्रत अद्याप बाहेर आली नसली, तरी सुनेत्रा पवार समर्थकांच्या म्हणण्यानुसार या पत्रात पटेल यांनी आयोगाला माहिती देताना पक्षातील सगळे अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्षांकडे असतील, असे म्हटले आहे. त्यातूनच संभ्रम निर्माण झाल्याने सुनेत्रा पवार यांनी १० मार्च रोजी आयोगाला दिलेल्या पत्रात त्यांच्या पत्रापूर्वी आयोगाकडे केलेला सगळा पत्रव्यवहार रद्दबातल समजावा, असे खास नमूद केले आहे. मात्र, पटेल व तटकरे समर्थकांच्या म्हणण्यानुसार असे म्हटल्याने सुनेत्रा पवार यांना ज्या विशेष अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले व त्यासाठी जी नोटीस जारी करून, २९३ सदस्यांना यासाठी निमंत्रित केले गेले तेही रद्दबातल होऊन सुनेत्रा पवार यांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा