• Thu. Jun 18th, 2026

    अनुदानित रासायनिक खतांचे वितरण आता ‘फार्मर आयडी’वर होणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 1, 2026
    अनुदानित रासायनिक खतांचे वितरण आता ‘फार्मर आयडी’वर होणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

    मुंबई दि. 1 : राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी आता ‘फार्मर आयडी’चा वापर करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

    केंद्रीय कृषी मंत्री व शेतकरी कल्याण मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली फार्मर आयडीसह इतर विषयांवर ऑनलाईन बैठकीप्रसंगी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली. अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीचा वापर करून देशातील पहिला पायलट प्रकल्प महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    या उपक्रमामुळे खतांचे वितरण अधिक नियोजनबद्ध, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने होणार असून, शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ थेट आणि योग्य पद्धतीने मिळणार आहे. तसेच बनावट व्यवहारांना आळा बसून प्रणाली अधिक विश्वासार्ह होणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

    या बैठकीत महाराष्ट्रात अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत सर्वाधिक प्रमाणात फार्मर आयडी तयार करण्यात आल्याबद्दल केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे अभिनंदन केले. तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केवळ चार दिवसांत सर्वाधिक निधीचे वितरण करण्यात आल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.

    केंद्रीय मंत्री चौहान यांनी पुढील काळात सर्व योजनांमध्ये फार्मर आयडीचा वापर वाढविण्याच्या सूचना दिल्या असून, महाराष्ट्राचा हा उपक्रम इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

    या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..

    0000

    संध्या गरवारे/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed