• Sat. Jun 6th, 2026

    भाजप स्वबळाच्या तयारीत, शिंदेसेनेनंही कंबर कसली; श्रीकांत शिंदेंकडे मोठी जबाबदारी, जम्बो टीम जाहीर

    भाजप स्वबळाच्या तयारीत, शिंदेसेनेनंही कंबर कसली; श्रीकांत शिंदेंकडे मोठी जबाबदारी, जम्बो टीम जाहीर

    Maharashtra Politics: भारतीय जनता पक्षानं २०२९ मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिलेला आहे. मित्रपक्षाची एकला चलो रेसाठी सुरु असलेली तयारी पाहता शिंदेसेनेनंही कंबर कसली आहे. मिशन २०२९ साठी शिंदेसेनेनं जम्बो टीम जाहीर केली आहे. त्यात श्रीकांत शिंदे यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पक्षाने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघ आणि ठाणे लोकसभेची जबाबदारी शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भिवंडी व कल्याण लोकसभेच्या संपर्कप्रमुखपदी खासदार नरेश म्हस्केंची निवड करण्यात आली आहे.

    शिवसेनेकडून राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई व दक्षिण मुंबई या मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदार संघांच्या संपर्कप्रमुख पदाची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खासदार डॉ. शिंदेंसोबत मंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर मुंबईच्या लोकसभा मतदार संघांची जबाबदारी असेल. तसेच ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुखपददेखील खासदार डॉ. शिंदेंकडे सोपवण्यात आले आहे, असे पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

    महाराष्ट्र भाजप ला आता कुबड्यांची गरज नाही. २०२९ मध्ये भाजप स्वबळावर लढेल आणि सत्तेचा सोपान गाठेल, अशी घोषणा गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहांनी केली होती. त्यामुळे पुढील निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार ही बाब स्पष्ट आहे. भाजपचा एकला चलो रेचा पवित्रा लक्षात घेता शिंदेसेनेनंही आतापासूनच लोकसभेची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी संपर्कप्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीला अद्याप तीन वर्षांचा कालावधी आहे. पण शिंदेसेनेनं त्यासाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे.

    लोकसभा मतदार संघनिहाय संपर्कप्रमुख-
    १) मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई व दक्षिण मुंबई – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
    २) ठाणे – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
    ३) भिवंडी व कल्याण – खासदार नरेश म्हस्के
    ४) नंदुरबार – माजी आमदार शिरीष चौधरी
    ५) धुळे व दिंडोरी – शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी
    ६) जळगाव – आमदार दिलीप लांडे
    ७) रावेर – आमदार तुकाराम काते
    ८) बुलढाणा – संजय सोनार
    ९) अकोला – माजी आमदार राजन साळवी
    १०) अमरावती – आमदार किशोर अप्पा पाटील
    ११) वर्धा – आमदार डॉ. मनीषा कायंदे
    १२) रामटेक – अनिल कोकीळ
    १३) नागपूर – माजी खासदार संजय निरुपम
    १४) भंडारा-गोंदिया – विलास चावरी
    १५) गडचिरोली- चिमूर – माजी मंत्री जगदीश गुप्ता
    १६) चंद्रपूर – आमदार कृपाल तुमाने
    १७) यवतमाळ – वाशिम – शिवसेना उपनेत्या प्रिती बंड
    १८) हिंगोली – शिवसेना उपनेते आनंदराव जाधव
    १९) नांदेड – दत्ता दळवी
    २०) परभणी – भास्कर आंबेकर
    २१) जालना – खासदार संदिपान भुमरे
    २२) छत्रपती संभाजी नगर – विलास पारकर
    २३) नाशिक – आमदार सुहास कांदे
    २४) पालघर – पांडुरंग पाटील
    २५) रायगड – अनिल नवघरे
    २६) कोल्हापूर, मावळ व पुणे लोकसभा – मंत्री उदय सामंत
    २७) बारामती – किरण लांडगे
    २८) शिरुर – आमदार शरद सोनवणे
    २९) अहिल्यानगर – शिवसेना सचिव राम रेपाळे
    ३०) शिर्डी – खासदार डॉ. ज्योती वाघमारे
    ३१) बीड – मनोज शिंदे
    ३२) धाराशिव – माजी खासदार उन्मेष पाटील
    ३३) लातूर – मंगेश कुडाळकर
    ३४) सोलापूर – खासदार धैर्यशील माने
    ३५) माढा – चंद्रहार पाटील
    ३६) सांगली – योगेश जानकर
    ३७) सातारा – शरद कणसे
    ३८) रत्नागिरी – राजेश मोरे, नगरसेवक
    ३९) सिंधूदुर्ग – बाळा चिंदरकर
    ४०) हातकणंगले – आमदार सुहास बाबर

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

    मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

    ‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

    टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

    लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

    लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

    २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

    शैक्षणिक पात्रता
    कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा