• Sun. Jun 7th, 2026

    Beed Crime: 23 वर्षीय ज्ञानेश्वरचे गावातील तरुणीवर प्रेम, कुटुंबाने बेदम मारलं अन् चोरीचा आळ; बदनामीच्या भीतीने तरुण नको ते करून बसला!

    Beed Crime: 23 वर्षीय ज्ञानेश्वरचे गावातील तरुणीवर प्रेम, कुटुंबाने बेदम मारलं अन् चोरीचा आळ; बदनामीच्या भीतीने तरुण नको ते करून बसला!

    Beed News: ही घटना उघडकीस येताच मांजरसुंबा परिसरात खळबळ उडाली. नातेवाईकांनी तातडीने धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

    23 वर्षीय ज्ञानेश्वर गावातील तरुणीसोबत प्रेमसंबंध, कुटुंबाने बेदम मारलं अन् चोरीचा आळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुनील जाधव, बीड : प्रेमसंबंधाच्या संशयावरून एका 23 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून त्याच्यावर चोरीचा खोटा आळ घेतल्याची धक्कादायक घटना मांजरसुंबा परिसरात घडली आहे. या जाचातू आणि समाजात होणाऱ्या बदनामीच्या भीतीपोटी ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी नेकनूर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मांजरसुंबा येथील रहिवासी असलेला ज्ञानेश्वर कोकाटे याचे नेकनूर जवळील एका गावातील तरुणीशी प्रेमसंबंध होते. या प्रकरणाची कुणकुण तरुणीच्या नातेवाईकांना लागली होती. तू आमच्या घराच्या परिसरात वारंवार चकरा का मारतोस? असा जाब विचारत तरुणीच्या नातेवाईकांनी ज्ञानेश्वरला गाठले. यावेळी केवळ शाब्दिक चकमक न होता, आरोपींनी ज्ञानेश्वरला बेदम मारहाण केली. इतक्यावरच न थांबता, त्याला समाजात बदनाम करण्याच्या उद्देशाने त्याच्यावर चोरीचा खोटा आरोप देखील ठेवण्यात आला. एका तरुण मुलासाठी चारचौघात झालेली मारहाण आणि चोरीचा लागलेला कलंक हे अत्यंत मानहानीकारक ठरले.

    शेडमध्ये संपवली जीवनयात्रा
    या मानसिक धक्क्यातून ज्ञानेश्वर सावरू शकला नाही. सततचा छळ आणि खोट्या आरोपांमुळे आलेल्या नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले. ज्ञानेश्वरने आविष्कार निवृत्ती रसाळ यांच्या मालकीच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन गळफास घेतला.

    पोलीस कारवाई आणि गुन्हा
    या प्रकरणी मयत ज्ञानेश्वरचे वडील तुकाराम साहेबराव कोकाटे यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आपल्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी मुलीच्या नातेवाईकांवर केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वसंत उंदरे, सचीन उंदरे, अशोक उंदरे, प्रेम उंदरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचीन धायगुडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. एका उमद्या तरुणाचा असा अंत झाल्याने कोकाटे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा