• Thu. Jun 18th, 2026

    Narhari Zirwal: झिरवाळांनी व्हिडिओबद्दल स्वतःच CM ना फोन केलेला, काय-काय म्हणाले? देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

    Narhari Zirwal: झिरवाळांनी व्हिडिओबद्दल स्वतःच CM ना फोन केलेला, काय-काय म्हणाले? देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

    CM Devendra Fadnavis: “फोनवर बोलणं झालं तेव्हा मी झिरवाळ यांना सल्ला दिला की, या व्हिडिओबाबत तुम्ही रीतसर तक्रार दाखल करा,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

    नरहरी झिरवाळ प्रकरणावर मुख्यमंत्र्‍यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मला फोन आलेला, व्हिडिओबद्दल त्यांनी माहिती दिलीय!(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: अन्न आणि औषध प्रशासन खात्यातील क्लार्कशी संबंधित लाच प्रकरणामुळे आधीच वादात सापडलेले अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांची पुन्हा एकदा कोंडी झाली आहे. झिरवाळ यांच्याशी संबंधित एक कथित व्हिडिओ व्हायरल होत असून एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत ते या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. शासकीय निवासस्थानावरील हा व्हिडिओ असल्याने शासकीय निवासस्थानाचा चुकीचा वापर केला गेल्याचं सांगत विरोधकांकडून नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे झिरवाळांवर कारवाई करणार का, असा प्रश्न आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांकडून विचारण्यात आला. त्यावर व्हिडिओबाबत चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

    आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी माझ्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दोघांमधील संवादाची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, “नरहरी झिरवाळ यांनी फोनवर माझ्याशी संपर्क करून सांगितलं आहे की, हा जो व्हिडिओ आहे तो तीन-चार व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे मी त्यांना सल्ला दिला आहे की, याबाबत तुम्ही पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल करा,” असं फडणवीस यांनी सांगितलं.

    दरम्यान, “नरहरी झिरवाळ यांच्या या व्हिडिओची शहानिशा पोलिसांकडून करण्यात येईल, जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याबाबतची सतत्या पडताळून राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार आणि आम्ही मिळून यावर योग्य निर्णय घेऊ,” अशी भूमिकाही मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे.

    राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार?

    राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध मंत्र्यांच्या मागे शुक्लकाष्ठ लागल्याचं चित्र आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला होता. त्यानंतर पाठोपाठ नाशिक जिल्ह्यातून विधानसभेत निवडून आलेले राज्याचे क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाच्या शिक्षेप्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचेच मंत्री अडचणीत आले असून नरहरी झिरवाळ यांच्यावरही राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा