• Mon. Jun 15th, 2026
    Nagpur News : शिधापत्रिकेवर तीन लीटर केरोसीन, नागपूरला मिळणार 120 किलोलीटरचा साठा

    इराण विरुद्ध इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून संभाव्य परिस्थितीचा विचार करता उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. तसेच गॅस सिलेंडरचा मुबलकसाठा देशात आहे. असं असलं तरी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारकडून शिधापत्रिकेवर तीन लीटर केरोसीनचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी नागपूरला 120 किलोलीटरचा साठा देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : मध्य पूर्व आशियात सुरु असलेल्या युद्धाचे पडसाद महाराष्ट्रातही बघायला मिळत आहेत. महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारने आधी घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणाला प्राधान्य दिलं आहे. तर व्यवसायिक सिलेंडरवर काही काळ बंदी टाकण्यात आली होती. आता यामध्येही सरकारकडून हळूहळू शिथिलता देण्यात येत आहे. असं असलं तरी संभाव्य परिस्थितीचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने आता केरोसीन वाटपाची तयारी पूर्ण केली आहे. युद्धाचा भडका शांत झाला नाही तर कदाचित एलपीजीच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या निर्देशांनुसार आता राज्यात शिधापत्रिकेवर प्रत्येकी 3 लीटर केरोसीन देण्यात येणार आहे.

    एलपीजी गॅसच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने केरोसिनचे तात्पुरते वितरण सुरू केले आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी 120 किलोलीटर केरोसिन मंजूर करण्यात आले आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक शिधापत्रिकाधारक कुटुंबाला 3 लीटर केरोसिन देण्यात येणार आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार, केंद्र सरकारकडून राज्याला एकूण ३७४४ किलोलीटर केरोसिन (३७ लाख ४४ हजार लिटर) उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हानिहाय वाटप करण्यात आले असून, नागपूर शहरासाठी केरोसिन वाटप शून्य ठेवण्यात आले आहे.

    अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असून, उपलब्धतेनुसार इतर कुटुंबांनाही केरोसिन दिले जाणार आहे. केरोसिनचे वितरण मार्च २०२६ पासून सुरू होऊन ४५ दिवसांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. रास्त भाव दुकानदार आणि परवानाधारक विक्रेत्यांमार्फत हे वितरण करण्यात येणार आहे.

    ग्राहकांना केरोसीन कितीला मिळेल?

    दरम्यान, केरोसिनचा गैरवापर रोखण्यासाठी जिल्हास्तरावर निरीक्षण पथके नियुक्त करण्यात येणार आहेत. अनधिकृत विक्री आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. नागपूरला अद्याप साठा मिळाला नाही. डेपोमध्ये केरोसीन आल्यानंतर दर निश्चित करण्यात येईल. ग्राहकाला ६० ते ६५ रुपये लीटरनुसार केरोसीन मिळण्याची शक्यता पुरवठा विभागाने वर्तविली आहे.

    शहराचा प्रस्तावही पाठवा

    गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने शहरी भागात पुन्हा केरोसीन वितरण सुरू करण्याची मागणी ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकीपर्स फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे. याबाबत संघटनेने अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन पाठविले. शहरी भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने शहरातील नागरिकांच्या मागणीचा प्रस्ताव राज्याला पाठवावा, अशी मागणी संघटनेचे कार्याध्यक्ष संजय पाटील यांनी केली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा