• Fri. Jun 5th, 2026
    मेळघाटसाठी निधी हवाच! ‘लाडकी बहीण’चा दाखला देत उच्च न्यायालयाचे सरकारला खडे बोल

    Mumbai HC On Melghat: आदिवासी भागांत एम. डी. डॉक्टर उपलब्ध नाहीत. तसेच अन्य ज्या डॉक्टरांची तात्पुरती नेमणूक होते, त्यांना नंतर लवकर अन्यत्र बदली मिळत नाही. त्यामुळे अनेक डॉक्टर इथे येण्यास टाळाटाळ करतात’, असे या क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते बंडू साने यांनी निदर्शनास आणले.

    मुंबई उच्च न्यायालय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : कल्याणकारी योजनांच्या तुलनेत आदिवासी भागांसाठी पुरेशी आर्थिक तरतूद न करणाऱ्या राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर उच्च न्यायालयाने बुधवारी ताशेरे ओढले. ‘मेळघाटसारख्या आदिवासी भागांमध्ये कुपोषणामुळे बालमृत्यू व मातामत्यू होण्याची समस्या कित्येक दशके कायम आहे. उच्च न्यायालयानेच गेल्या सुमारे साडेतीन दशकांपासून कित्येकदा निर्देश दिल्यानंतरही ही समस्या संपलेली नाही. तरीही रुग्णालय, वैद्यकीय सुविधांची कमतरता आहे. मग काहीच काम करत नसतानाही लोकांना आर्थिक मदत देण्यासाठी (लाडकी बहीण) राज्य सरकारकडे निधी असेल तर आदिवासी भागांसाठीही असायलाच पाहिजे’, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला खडे बोल सुनावले.

    मेळघाट व अन्य आदिवासी भागांतील कुपोषण व बालमृत्यूंच्या समस्येवर डॉ. राजेंद्र बर्मा यांच्यासह अन्य काहींनी केलेल्या याचिकांवर न्या. रवींद्र घुगे व न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर पुढील सुनावणी झाली. तेव्हा, ‘धारणीमध्ये सध्याच्या ५०ऐवजी तीनशे खाटांचे सामान्य रुग्णालय उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे एकाच जिल्ह्यात दोन रुग्णालये, हे प्रथमच होणार आहे. त्याशिवाय अन्य उपायही करण्यात येत आहेत’, अशी माहिती सरकारी वकील भूपेश सामंत यांनी खंडपीठाला दिली.

    Maharashtra TimesCIDCO Lottery Stay: मुंबई हायकोर्टाचा सिडकोला दणका! ‘पीएमएवाय’ योजनेत गरिबांची चेष्टा; 26 हजार घरांच्या सोडतीला स्थगिती
    तर, ‘उच्च न्यायालयाने २००१मध्येच म्हटले होते की, धारणीमध्ये अधिक खाटांचे रुग्णालय असायला हवे. आपण आज २०२६मध्ये आहोत. आता सरकार अधिक खाटांचे रुग्णालय करणार म्हणते. प्रत्यक्षात ते कधी सुरू होणार, हे देवालाच ठाऊक. मी स्वत: आदिवासी भागांतील बालमृत्यूंचा प्रश्न लावून धरण्यासाठी गेल्या तीन दशकांपासून नागपूरहून या सुनावणीसाठी मुंबईत सातत्याने येत आहे. या समस्येबाबत खुद्द उच्च न्यायालयानेच आत्तापर्यंत शंभर तरी निर्देश दिले असतील, तरीही ही परिस्थिती आहे. मागील दोन वर्षांत आदिवासी भागांत कुपाषेण व आवश्यक वैद्यकीय सुविधांअभावी ३२ हजार मृत्यू झाल्याची माहिती खुद्द सरकारनेच अधिवेशनात जाहीर केली’, असे याचिकाकर्त्यातर्फे ॲड. जे. टी. गिल्डा यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणले.

    Maharashtra TimesAjit Pawar Case : ‘आकाश-पाताळ एक करु, कुणाचा बाप जरी असला तरी त्याचा मुर्दाही खोदून काढू’, फडणवीसांचं रोहित पवारांना आश्वासन
    ‘वास्तविक तीनशे खाटांच्या रुग्णालयाचा निर्णय आता घेतला असला तरी तो खूप पूर्वीच व्हायला हवा होता. गेल्या साडेतीन दशकांपासून ही समस्या कायम आहे. आता ते रुग्णालय नेमके कधीपर्यंत पूर्ण होणार ते सांगा. न्यायालयाने किती वेळा आदेश द्यायचे? न्यायालयीन आदेशाच्या अवमानाच्या बाबतीतही सर्वाधिक प्रकरणे ही सरकारविरोधात असल्याचे सर्वोच्च न्यायालयानेही अलीकडे नमूद केले.’, अशी नापसंती खंडपीठाने व्यक्त केली. तर, ‘सध्याच्या ५० खाटांच्या रुग्णालयाच्या बाबतीतही सर्व आलबेल नाही.

    Maharashtra TimesRohit Pawar : रोहित पवारांनी १६ फेब्रुवारीचं पत्र बाहेर काढलं, पटेल-तटकरेंवर गंभीर आरोप; पक्ष ताब्यात घेण्याच्या प्रयत्नाचा दावा
    ‘अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता हा टक्क्यांमध्ये वाढतो. मात्र, आता सरकारने आदिवासी बालकांच्या पोषण आहारातील केळी व अंडी यासाठी दोन रुपयांची वाढ करत केवळ आठ रुपयांची तरतूद केल्याचे दिसते. ‘लाडकी बहीण’साठी निधी द्यायला सरकारकडे पैसे आहेत, परंतु त्या बालकांसाठी नाही का?’, असा प्रश्न गिल्डा यांनी उपस्थित केला. तेव्हा, ‘काही काम न करताही लोकांना आर्थिक मदत देण्याकरिता सरकारकडे निधी असेल तर आदिवासी भागांतील रुग्णालये, वैद्यकीय सुविधा यासाठीही निधी असायलाच पाहिजे’, अशा शब्दांत खंडपीठाने सरकारला खडे बोल सुनावले

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा