• Sat. Jun 6th, 2026
    Narhari Zirwal: भेसळखोरांवर ‘मकोका’ लावणार! अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळांची विधान परिषदेत घोषणा

    Narhari Zirwal: वसई आणि अंधेरी परिसरात अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात दुधातील भेसळप्रकरणी १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चार जणांना तडीपार करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहितीही झिरवाळ यांनी दिली.

    नरहरी झिरवाळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : ‘राज्यातील अन्नसुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी तपासणी मोहिमा अधिक व्यापक करण्यात येतील. अन्नपदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल’, अशी ग्वाही अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सोमवारी दिली. याविषयी आमदार मनीषा कायंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

    वर्सोवा पोलिस ठाण्याच्या पथकासह नवजित नगर, अंधेरी (प.) येथे एकूण सात ठिकाणी छापा टाकला असता तेथे अमूल आणि गोकुळ या नामांकित ब्रँडचे लेबल असलेल्या दुधामध्ये भेसळ करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचे झिरवाळ यांनी सांगितले. या प्रकरणात आत्तापर्यंत १४ जणांवर अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यावर आमदार भाई जगताप यांनी, या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला. परंतु, मकोकाच्या धर्तीवर एक नवा कायदा येत असल्याचे झिरवाळ यांनी सांगितले. मात्र, त्यावर आमदार जगताप आणि अनिल परब यांनी जोरदार आक्षेप घेतला. जीवनावश्यक वस्तूत भेसळ झाल्यावर जिवावर बेतू शकते हे माहिती असून संघटित गुन्हेगारीवर मकोका का लावता येत नाही, असा प्रश्न विचारला.

    Maharashtra TimesRaj Thackeray: कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र? अशोक खरात प्रकरणावरुन राज ठाकरेंचा तीव्र संताप
    त्यावर, कायदेशीर बाबी तपासून अधिवेशन संपण्याआधी खुलासा करू, असे उत्तर झिरवाळ यांनी दिले. त्यावर आमदार परब यांनी आक्षेप घेत, मकोका लावणार की नाही, हे स्पष्ट सांगणार की नाही अशी विचारणा केली. तर, आमदार जगताप यांनी हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला भेडसावणारा असून त्यावर कठोर कारवाई करण्याचे सोडून अधिकाऱ्यांना का वाचवत आहात, १०-१२ बळी गेल्यावर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित केला. अखेर, विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार झाल्यावर मंत्री झिरवाळ यांनी, सभागृहातील सदस्यांची भावना लक्षात घेता भेसळखोरांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे घोषित केले.

    तत्पूर्वी, या विभागात अपुरे मनुष्यबळ असल्याचे झिरवाळ यांनी मान्य केले. विभागाच्या २,५४४ मंजूर पदांपैकी केवळ १,२७१ पदे भरण्यात आली असून उर्वरित पदे भरण्याचा प्रस्ताव वित्त विभागाला पाठविण्यात आला होता. परंतु, त्यात काही त्रुटी काढण्यात आल्याने त्यावर कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट केले. तसेच, विभागात पदे वाढविण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचीही माहिती त्यांनी दिली. भेसळ रोखण्यासाठी भरारी पथकांनी आपले छापे वाढवावेत यासाठी सूचना देण्यात येतील, असे ते म्हणाले. विभागात १९७ कर्मचाऱ्यांची भरती करून त्यांना प्रशिक्षणानंतर पदस्थापना देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

    Maharashtra TimesPrasenjit Fadnavis: मुख्यमंत्र्यांचे चुलत बंधू महाबँकेचे संचालक! आधीच अनेक पदे असताना नव्या जबाबदारीमुळे चर्चेला उधाण
    चांगले दूध प्यायलो तरी पचायचे नाही

    ‘शहरात आणि राज्यात दुधाचे पदार्थ खाण्यासही भीती वाटते’, असे आमदार भाई जगताप म्हणाले. ‘दुधापासून तयार होणारे पदार्थ खाण्यास मन धजावत नाही हे सांगतानाच, दुधातील भेसळीची इतकी सवय झाली आहे की चुकून चांगले दूध प्यायलो तर पचायचे नाही’, असा टोलाही त्यांनी लगावला. अधिकारी-पोलिस यांची यात एक मालिकाच असून त्यांच्या आशीर्वादाने भेसळीचे संगनमत असल्याचा – आरोप त्यांनी केला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा