• Sun. Jun 7th, 2026
    Raj Thackeray: कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र? अशोक खरात प्रकरणावरुन राज ठाकरेंचा तीव्र संताप

    Raj Thackeray On Ashok Kharat Case: महाराष्ट्राचे संपूर्ण राजकीय भावविश्व अडकले असल्याचे राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

    राज ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : अशोक खरात प्रकरणातील हिडीस तपशील वाचून शब्दशः गरगरल्यासारखे झाले. अवघ्या काही दिवसांपूर्वी गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसे या देशाला दिली आहेत याचे सादरीकरण केले होते. त्याच महाराष्ट्रात अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेव्हा खरंच, ‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र’ हा प्रश्न पडतो, असा उद्विग्न सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी सोशल मीडियातून उपस्थित केला.

    या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात की, हा खरात स्त्रियांचे शोषण करतोय, ते झाले तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपले भले करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही.

    Maharashtra TimesPrasenjit Fadnavis: मुख्यमंत्र्यांचे चुलत बंधू महाबँकेचे संचालक! आधीच अनेक पदे असताना नव्या जबाबदारीमुळे चर्चेला उधाण
    आधी आमदार खासदारकीची तिकिटे मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळाले तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळाले की झाले, मग पुन्हा ते टिकावे म्हणून धडपड आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझे काय याची घोर चिंता.

    Maharashtra Timesसंवैधानिक पदाच्या राजीनाम्यानंतर Rupali Chakankar यांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा घेणार का? राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने दिली महत्त्वाची माहिती
    मुख्यमंत्र्यांना आवाहन
    या पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आवाहन केले आहे. ते नमूद करतात की, ‘धोबीपछाड राजकारण बाजूला ठेऊन या प्रकरणाचा छडा लावा. दैवी शक्तीच्या नावाखाली, राजसत्तेच्या आशीर्वादाने जर स्त्रियांचे शोषण होत असेल तर याच्या इतकं गंभीर काहीच नाही. आणि याला जर वेळीच आवर नाही घातला तर महाराष्ट्राचं वाटोळं झालं म्हणून समजा. तेव्हा या प्रकरणातले सगळे दोषी शोधून काढा, त्यांना ठेचून काढा. तसे केले तर आणि तरच तुमच्या भाषणांत तुम्हाला संतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देण्याचा अधिकार आहे. अन्यथा नाही’.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा