• Sun. Jun 7th, 2026

    उत्तन-विरार सी-लिंकमुळे मरिन ड्राइव्ह ते विरार जोडणी, अटल सेतूपेक्षा लांब मार्ग; 30 मिनिटांत होणार अंतर पार

    उत्तन-विरार सी-लिंकमुळे मरिन ड्राइव्ह ते विरार जोडणी, अटल सेतूपेक्षा लांब मार्ग; 30 मिनिटांत होणार अंतर पार

    Sea Link Update: उत्तन-विरार सी लिंक एका दिशेला थेट मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाला जोडणार आहे तर दुसऱ्या दिशेने वर्सोवा-भाईंदर सागरी किनारा मार्गाला जोडणार आहे. या मार्गामुळे मरिन ड्राइव्ह ते विरार थेट जोडणी मिळणार आहे.

    मुंबई: मुंबईतील सागरी किनारा मार्गाच्या उत्तरेकडील भागात उत्तन-विरार सी लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यासाठी राज्य सरकाने सविस्तर प्रकल्प अहवाला मंजुरी दिली असून पर्यावरणा संबंधित सर्व परवानग्याही देण्यात आल्या आहेत. यासाठी टेंडर मे 2026पासून मागवायला सुरुवात करणार आहेत. मुंबईतील अटल सेतूपेक्षाही लांब असा हा प्रस्तावित मार्ग असेल.

    कसा असेल मार्ग?

    उत्तन-विरार सी लिंक प्रकल्प 55.12 किमी लांब असेल. या मार्गामुळे दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट ते विरार आणि पुढे पालघरपर्यंत प्रवास सोपा आणि वेगवान होणार आहे. उत्तर आणि दक्षिण किनारपट्टीला जोडणारा हा आठ पदरी मार्ग असेल. सध्या 90 मिनिटांचा प्रवास या मार्गामुळे 30 ते 40 मिनिटांवर येणार आहे. या मार्गावर एक मुख्य सागरी पूल, अप्रोच मार्ग, आणि अनेक इंटरचेंजेसचा समावेश आहे. परंतु या सी लिंक प्रकल्पासाठी तब्बल 100 हेक्टर खारफुटी बाधित होणार आहेत.

    पहिला टप्पा कुठे?

    या प्रकल्पाचं काम सध्या दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात उत्तन ते विरारदरम्यान 24.35 लांब सागरी पुलाने भाईंदरजवळ जोडणार आहे. यामध्ये सी लिंक आणि अप्रोच मार्ग अशा दोन महत्त्वपूर्ण मार्गांचा समावेश आहे. यामध्ये उत्तनला जोडणारा 9.32 किमी लांब मार्ग, वसईला जोडणारा 2.5 किमी लांब मार्ग आणि विरारपर्यंत 18.95 किमी लांब मार्गाचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी सध्या 58,754 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

    दरम्यान, प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात या मार्गाला पुढे पालघरपर्यंत जोडण्यात येणार आहे. या मार्गामुळे पश्चिम द्रुतगती मार्ग, एसव्ही रोड आणि लिंक रोडवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच, उत्तन- भाईंदर, वसई-विरारला थेट मुंबईशी जोडणी मिळणार आहे. दुसरा टप्पा पूर्ण होताच नवीन तयार होणाऱ्या वाढवण बंदरालाही थेट जोडणी मिळणार आहे.

    Maharashtra TimesSion-Panvel Highway: ‘टी-जंक्शन’वरील कोंडी फुटणार! शीव-पनवेल महामार्गावर पुलाचा विस्तार; दोन मार्गांमुळे पूर्व मुंबईकरांना फायदा

    मुंबईत सध्या बऱ्याच महत्वाकांक्षी प्रकल्पांचं काम सुरू आहे. त्यांचाच एक भाग उत्तन-विरार सी लिंक देखील आहे. यामध्ये मुंबईतील सागरी किनारा मार्ग, वांद्रे-वरळी सी लिंक, अटल सेतू, ऑरेंज गेट टनल, वर्सोवा-वांद्रे सी लिंक, उत्तर सागरी किनारा मार्ग, दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि शिवडी-वरळी कनेक्टरचा समावेश आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा