• Tue. Jun 16th, 2026

    Kolhapur Crime: मम्मी, पप्पा…मला माफ करा; शिवाजी विद्यापीठात 23 वर्षीय इशिताने जीवन संपवलं, शेवटची चिठ्ठी पोलिसांना सापडली!

    Kolhapur Crime: मम्मी, पप्पा…मला माफ करा; शिवाजी विद्यापीठात 23 वर्षीय इशिताने जीवन संपवलं, शेवटची चिठ्ठी पोलिसांना सापडली!

    Shivaji University News: इशिताच्या वापरातील मोबाइल फोन, लॅपटॉप ताब्यात घेतला असून, त्यातील माहिती तपासली जात आहे.

    मम्मी, पप्पा…मला माफ करा; शिवाजी विद्यापीठात 23 वर्षीय इशिताने जीवन संपवलं, शेवटची चिठ्ठी पोलिसांना सापडली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात एक धक्कादाक घटना घडली आहे. ऑगस्ट महिन्यात एका विद्यार्थीनीने वसतिगृहात आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते. या घटनेला काही महिने उलटतात तोच आता पुन्हा एका विद्यार्थिनीने वसतिगृहातच पंख्याला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात शुक्रवारी (21 मार्च) रात्री ही घटना उघडकीस आली. इशिता मधुसुदन सावंत (वय 23, रा. गोवा) हिने छताच्या हुकाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन जीवन संपविले. शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. द्वितीय वर्षातील ती विद्यार्थिनी होती. वसतिगृहातील वॉर्डन शीला यशवंत सोनवणे यांच्या ही घटना लक्षात आल्यामुळे त्यांनी गळफास सोडवण्याचा प्रयत्न केला, तरी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. राजारामपुरी पोलिस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करत आहेत. गेल्या वर्षभरात विद्यापीठात विद्यार्थिनीची ही दुसरीच अशी घटना घडली आहे.

    नेमकं काय घडलं?
    इशिता मधुसुदन सावंत ही शिवाजी विद्यापीठात मानसशास्त्र विभागात एम. ए. द्वितीय वर्षात शिकत होती. वसतिगृहातील खोली क्रमांक 30 मध्ये ती चार मैत्रिणींसह राहत होती. मात्र गुढीपाडव्याच्या सुट्टीमुळे इतर मैत्रिणी परगावी गेल्या असल्याने ईशिता शुक्रवारी दिवसभर एकटीच खोलीत होती. वॉर्डन शीला यशवंत सोनवणे यांना रात्री 11 वाजता नियमित तपासणीवेळी ईशिताच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. त्यांनी दरवाजा ठोठावून बघितले तसेच दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

    काही विद्यार्थिनींनी खिडकीतून आत डोकावले. त्यांना आतमध्ये इशिताने छताच्या फॅनच्या हुकाला नायलॉन दोरीने गळफास लावून घेतल्याचे दिसले. वॉर्डन सोनवणे यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांना मदतीने गळफास सोडवण्यात यश मिळविले. बेशुद्ध अवस्थेतील इशिताला सी.पी.आर. शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपास केल्यानंतर ती उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.

    याबाबत राजारामपुरी पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले. उत्तरीय तपासणीनंतर पहाटे नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

    चिठ्ठी सापडली!
    तपासादरम्यान पोलिसांना एक चिठ्ठी देखील इशिताच्या खोलीतून हाती लागली आहे. ‘मिस यू डॅडी, मम्मी, मला माफ करा’ असे शेवटचे शब्द इशिताने मृत्यूपूर्वी ही चिठ्ठीमध्ये लिहिल्याचे निदर्शनास आले आहे. तर स्वतःची जन्मतारीख देखील इशिताने लिहिली होती. त्यामुळे पोलिस याबाबतही अधिक तपास करत आहेत. तिच्या मोबाईल कॉल हिस्टरी आणि इतर तपासाअंती काही गोष्टी आणि मृत्यूचे कारण समजू शकेल असे पोलिसांनी सांगितले आहे.

    विद्यापीठातील पूर्वीची घटना
    गेल्या वर्षभरात शिवाजी विद्यापीठात विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी एम.एस्‌सी. विभागातील एका विद्यार्थिनीने असाच गळफास घेऊन टोकाचा निर्णय घेतला होता. विद्यापीठ प्रशासनाने यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले असून, समुपदेशन केंद्राची सुविधा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. वसतिगृहातील नियमित तपासणी आणि विद्यार्थ्यांशी संवाद वाढवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मात्र पुन्हा एकदा घडलेल्या या घटनेमुळे विद्यापीठ वसतिगृहातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा