• Wed. Mar 18th, 2026

    Pune LPG Cylinder: बुकिंगनंतर 96 तासांत सिलिंडर घरात! एजन्सी, गोदामाबाहेर रांगा लावण्याची गरज नाही; पुण्यात घरपोच सेवेची सक्ती

    Pune LPG Cylinder: बुकिंगनंतर 96 तासांत सिलिंडर घरात! एजन्सी, गोदामाबाहेर रांगा लावण्याची गरज नाही; पुण्यात घरपोच सेवेची सक्ती

    Pune LPG Shortage: पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी गॅस वितरकांवर घरपोच सिलिंडर देण्याची सक्ती केली आहे. काळाबाजार रोखण्यासाठी फक्त ओटीपी द्वारेच वितरण होणार असून बुकिंगनंतर अवघ्या 96 तासांत घरपोच सिलिंडर देण्याचे आदेश दिले आहेत.

    म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे शहर जिल्ह्यात गॅसचा काळाबाजार आणि कृत्रिम टंचाई होत असल्याच्या प्रकाराची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. घरगुती गॅसचे वितरण आता ‘ओटीपी’ प्रणालीद्वारेच करण्यात येणार असून, नोंदणी केल्यानंतर अवघ्या ९६ तासांच्या आत घरपोच सिलिंडर मिळणार आहे. त्यामुळे वितरकांच्या दुकानाबाहेर रांगा लावण्याची गरज नाही. त्याबाबत घरपोच सिलिंडर देण्याची गॅस वितरकांवर सक्ती करण्यात आली आहे.

    पोलिस संरक्षण देण्याचे आदेश

    जिल्हाधिकारी कार्यालयात गॅस वितरक कंपन्याचे प्रतिनिधी, गॅस एजन्सीचे प्रतिनिधी, तसेच पोलिस अधिकारी यांची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्या वेळी जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर, तसेच विविध प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी गॅस वितरकांशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्या वेळी वितरकांसह कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी गॅस वितरकांना पोलिस सरंक्षण देण्याचे आदेश दिले आहेत.Maharashtra TimesMumbai Gas Shortage: गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे मुंबईसमोर आता नवं संकट; लोकांनी चुली पेटवल्या, प्रदूषण वाढण्याचा धोका

    घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा केवळ ‘ओटीपी’ प्रणालीद्वारेच करण्यात यावा. तसेच गोदाम, गॅस एजन्सी किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून थेट गॅस सिलिंडरचे वितरण पूर्णपणे बंद ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तेल कंपन्यांसह वितरकांना दिल्या आहेत. त्याशिवाय सर्व गॅस एजन्सींनी त्यांच्या गोदाम किंवा कार्यालयाबाहेर ‘गॅस सिलेंडरचे वितरण फक्त ओटीपी’द्वारेच ९६ तासांच्या आत घरपोच करण्यात येईल,’ असा आशय दर्शविणारे फलक लावावेत. त्याबाबत ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमाकांवर त्या संदर्भातील संदेशही पाठवावा. त्यामुळे गॅस एजन्सीच्या दुकानासमोर गर्दी करू नये, असा संदेश पाठविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

    “घरगुती गॅस सिलिंडरचे बुकिंग केल्यानंतर ९६ तासांच्या आत घरपोच वितरण करणे वितरकांवर बंधनकारक राहील, नियमानुसार सुरू असलेल्या गॅस सिलिंडर वितरण प्रक्रियेत कोणीही अडथळा निर्माण केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करावी. तसेच गॅस एजन्सीनी कोणताही अवैध व्यापार होणार नाही यासाठी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे. बेकायदा गॅसचा पुरवठा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल,” अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

    तेल कंपन्यांना सूचना

    • दैनंदिन गॅस रिफिलिंगची क्षमता वाढविण्याचे गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना आदेश
    • कंपनीच्या स्तरावरून गॅस वितरकांसाठी ज्या काही सूचना असतील त्या सर्व वितरकांना लेखी कळविण्याबाबत आदेश द्यावेत
    • दुसरे गॅस सिलिंडर वाटपाच्या कालवाधीचे निकष महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीत गॅस एजन्सीना २५ दिवस, ग्रामीण भागांत एजन्सींना ४५ दिवस करावेत.
    • औद्योगिकीकरण झालेल्या हिंजवडी भागात हा निकष २५ दिवसांचा करावा.

    जिल्हाधिकाऱ्यांच्या पोलिसांना सूचना

    • गॅस सिलिंडरच्या वितरणात कोणीही अडथळे, हस्तक्षेप केल्यास तक्रारीनुसार कारवाई करावी.
    • कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने वेळोवेळी योग्य तो बंदोबस्त देण्यात यावा.
    • गॅस एजन्सीधारकांनी वितरणाबाबत मागणी केल्यास नियमानुसार पोलिस संरक्षण द्यावे.
    • अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी वेळोवेळी गॅस एजन्सी व गोदामाच्या ठिकाणी पोलिसांनी भेटी द्याव्यात.

    Maharashtra TimesNishikant Dubey: भाजपच्या निशिकांत दुबेंच्या VIP दर्शनाची चौकशी होणार, भीमाशंकर मंदिर बंद असतानाही प्रवेश; दोषींवर कारवाईचे आश्वासन

    पुणे जिल्ह्यातील सिलिंडर ग्राहक

    • १६,००,००० हिंदुस्थान पेट्रोलियम (एचपीसीएल)
    • २०, २३, ८०० भारत पेट्रोलियम (बीपीसीएल)
    • २, १२, ३५६ इंडियन ऑइल (आयओसी)
    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा