• Fri. Sep 11th, 2026

राज्यपालांच्या उपस्थितीत स्पिक-मॅके ‘मीटिंग ऑफ माईंडस’ बैठक संपन्न – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 11, 2026

मुंबई, दि. ११ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अँड कल्चर अमंगस्ट यूथ (स्पिक-मॅके) या संस्थेच्या  पदाधिकारी व सल्लागार सदस्यांची बैठक (मिटिंग ऑफ माइंड्स) लोकभवन येथे झाली.

स्पिक मॅके ही विद्यार्थी व युवकांना भारताच्या संस्कृतीशी जोडण्याचे काम करणारी राष्ट्रीय संस्था असून संस्थेचे कार्य आज अधिक प्रासंगिक असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

आपण एका संगीत प्रेमी घराण्यातून आलो असून स्पिक मॅके व इंटॅच संस्थेसोबत अनेक वर्षांपासून जुळलो असल्याचे राज्यपालांनी सांगितले. या दोन संस्थांसोबत काम करण्याचा अनुभव समृद्ध करणारा असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

१९७७ मध्ये स्थापन झालेल्या स्पिक मॅके संस्थेचे मुख्य आश्रयदाते होण्याचे मान्य केल्याबद्दल संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष कुंदा माहूरकर यांनी राज्यपालांचे आभार मानले. पुढील वर्षी २०२७ साली स्पिक मॅके स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असून आयआयटी दिल्ली येथे व त्यानंतर आयआयटी मुंबई येथे सुवर्ण महोत्सवी शिबिराचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शास्त्रीय संगीत व नृत्य विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवते. आज मुलांची व पालकांचीही बुद्धी चंचल झाली असल्याचे सांगून आपण मुलांना जीवनातील संघर्षांना तोंड देण्यासाठी पुरेसे तयार करीत नसल्याचे निरीक्षण संस्थेचे संस्थापक डॉ.किरण सेठ यांनी नोंदवले.

स्पिक मॅके मुलांच्या व युवकांच्या सृजनात्मक शक्तीला शास्त्रीय कलांच्या माध्यमातून चालना देण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीला उद्योगपती शेखर बजाज, सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी, संजय कुमार यादव, सुशील कुमार जीवराजका, माया शहानी, सूचित नंदा, योगेश आंधळे, ममता भट्टाचार्य, आदि उपस्थित होते.

बैठकीनंतर दरबार हॉल येथे राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी विख्यात शास्त्रीय गायिका परवीन सुलताना यांचे गायन ऐकले. सर्व मुलांनी भारतीय बैठकीत बसून गायन ऐकले. परवीन सुलताना यांना मुकुंदराज देव (तबला) व श्रीनिवास आचार्य (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed