• Thu. Mar 5th, 2026

    महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देण्याची गरज – मंत्री ॲड.आशिष शेलार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 5, 2026
    महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देण्याची गरज – मंत्री ॲड.आशिष शेलार – महासंवाद

    Milind Kadam M4B

    मुंबई, दि. ५: महिलांच्या कला, सृजनशीलता आणि कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक असून महिलांच्या प्रतिभेला सजगतेने ओळख देणे गरजेचे आहे, असे मत सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी व्यक्त केले.

    Milind Kadam M4B

    मुंबईतील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे आयोजित महिला कला महोत्सव २०२६ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य महिला आयोगच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, ज्येष्ठ गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे, राजश्री कुलकर्णी, नृत्यांगना सोनिया परचुरे, पुढारी मल्टीमीडियाच्या संपादक मृणालिनी नानिवडेकर, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, विविध क्षेत्रातील कलाकार, साहित्यिक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Milind Kadam M4B

    मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे नूतनीकरण झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात येथे सुमारे एक हजाराहून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. हे प्रांगण कलाकारांसाठी कला आविष्काराचा महायज्ञ ठरले असून येथे प्रत्येकाला आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी मिळत आहे.

    आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले की, महिला दिन केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न राहता महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचा दिवस आहे. समाजाने आपल्या घरात, कुटुंबात आणि परिसरात महिलांची प्रतिभा आणि क्षमता ओळखून त्यांना पुढे येण्यासाठी संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

    महिलांचे हक्क, समानता आणि सबलीकरण या आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२६ च्या संकल्पनेचा उल्लेख करताना मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे.

    महिलांच्या सक्षमीकरणासाठी जनजागृती उपक्रम महत्त्वाचे – नंदिनी आवडे

    महिलांच्या तक्रारींची संख्या वाढत असताना त्यांच्या समस्यांवर केवळ कायदेशीर मार्ग पुरेसा नसून महिलांमध्ये आत्मविश्वास व सक्षमीकरणाची भावना निर्माण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी केले.

    सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमांमधून महिलांच्या संघर्ष आणि प्रेरणादायी बाबी समाजासमोर मांडल्या जात असून या माध्यमातून महिलांमध्ये सजगता आणि आत्मविश्वास वाढेल, असा विश्वास आवडे यांनी व्यक्त केला.

    पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात महिला कला महोत्सव २०२६ कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. ७ मार्च २०२६ पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.

    ०००

    संजय ओरके/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed