• Fri. Sep 18th, 2026

वर्धा येथे राज्यातील पाचवे शासकीय मत्स्यविज्ञान महाविद्यालय व भव्य मत्स्य बाजार होणार – मंत्री नितेश राणे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 4, 2026
वर्धा येथे राज्यातील पाचवे शासकीय मत्स्यविज्ञान महाविद्यालय व भव्य मत्स्य बाजार होणार – मंत्री नितेश राणे – महासंवाद

मुंबई, दि.४ : वर्धा जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वर्धा येथे नवीन मत्स्यविज्ञान महाविद्यालय आणि अत्याधुनिक मत्स्य बाजार स्थापन करण्याबाबत सविस्तर चर्चा होऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

वर्धा शहरात मच्छीमार आणि ग्राहकांसाठी सर्वसोयीनियुक्त असा भव्य मत्स्य बाजार उभारण्यात येणार आहे. या मत्स्य बाजारासाठी १ लाख स्क्वेअर फूट जागेची निश्चिती करण्यात आली आहे. या प्रकल्पाची अधिकृत घोषणा येत्या ६ मार्चपर्यंत केली जाईल.

या आधुनिक बाजारामुळे साठवणूक, विक्री आणि विपणन साखळी अधिक मजबूत होईल.

राज्यात सध्या चार मत्स्यविज्ञान महाविद्यालये कार्यरत असून, वर्धा येथे स्थापन होणारे महाविद्यालय हे राज्यातील पाच वे महाविद्यालय ठरणार आहे. या महाविद्यालयामुळे वर्धा जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील तरुणांना मत्स्य व्यवसायातील उच्च शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

महाविद्यालयाचे अंतिम स्वरूप तयार झाल्यानंतर या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून अंतिम मंजुरी घेतली जाईल, असे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.

‘वर्ध्यातील हे महाविद्यालय विदर्भातील मत्स्यव्यवसाय शिक्षणासाठी मैलाचा दगड ठरेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्याचा आमचा मानस आहे’ असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

या बैठकीला राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, पदुम सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी,संबंधित अधिकारी आणि वर्धा जिल्हाधिकारी सी.वान्मथी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) सहभागी होते.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed