• Fri. Mar 6th, 2026

    जळगाव जिल्ह्यातील केळी पिकावरील ‘पनामा (टीआर४) रोगाबाबत शास्त्रीय उपाययोजना व जनजागृतीसाठी संयुक्त अभ्यास समिती स्थापन – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 4, 2026
    जळगाव जिल्ह्यातील केळी पिकावरील ‘पनामा (टीआर४) रोगाबाबत शास्त्रीय उपाययोजना व जनजागृतीसाठी संयुक्त अभ्यास समिती स्थापन – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

    मुंबई, दि. ४ :जळगाव जिल्ह्यातील केळी पिकावर आढळलेल्या पनामा (टीआर४) फंगस रोगाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत या रोगाच्या प्रतिबंधासाठी शास्त्रीय उपाययोजना निश्चित करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी संयुक्त अभ्यास समिती स्थापन करण्याची घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. या निर्णयामुळे राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, पनामा (टीआर४) हा केळी पिकासाठी अत्यंत घातक फंगसजन्य रोग असून त्याचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने शास्त्रीय आणि समन्वित उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातील तज्ञ शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी आणि प्रगतीशील शेतकरी यांचा समावेश असलेली संयुक्त अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती रोगाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना आणि जनजागृती मोहिमेची रूपरेषा तयार करणार आहे.

    तसेच केळी पिकावर पनामा (टीआर४) रोगाची लागण झाल्यानंतर कोणत्या उपाययोजना कराव्यात, रोगाचा प्रसार कसा थांबवावा आणि शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन कसे द्यावे याबाबतही समिती सविस्तर अहवाल तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    या समितीत आमदार अनिल पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल जावळे, आमदार संजय कुटे, उद्योजक अजित जैन, अप्पर मुख्य सचिव (कृषी), कृषी आयुक्त, महासंचालक (कृषी), फलोत्पादन संचालक, कृषी तज्ञ के. बी. पाटील, प्रगतीशील शेतकरी साहेबराव मोहिते, केळी संशोधन केंद्राचे अरुण भोसले, राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे डॉ. आर. सेल्वराजन, वनस्पती रोग शास्त्रज्ञ व्ही. टी. गुजर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रा. आर. टी. गायकवाड तसेच जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

    कृषी मंत्री भरणे यांनी समिती सदस्यांना निर्देश देताना सांगितले की, जळगाव, पुणे आणि सोलापूर या प्रमुख केळी उत्पादक जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधावा. तसेच शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी आणि शेतकरी यांच्यासोबत चर्चासत्र आयोजित करून रोग नियंत्रणासाठी सर्वसमावेशक कार्यप्रणाली तयार करावी.

    तसेच कृषी विभागामार्फत केळी उत्पादक जिल्ह्यांमध्ये विशेष जनजागृती मोहीम, शेतकरी मार्गदर्शन शिबिरे आणि तांत्रिक माहितीपत्रके उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

    0000

    संध्या गरवारे/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed