• Fri. Mar 6th, 2026

    Pune Crime: मूळचा ठाण्याचा, पुण्यातील तरुणींना प्रपोज, नकार येताच विकृत्य कृत्य; नराधम तरुणाला अखेर पोलिसांकडून अटक

    Pune Crime: मूळचा ठाण्याचा, पुण्यातील तरुणींना प्रपोज, नकार येताच विकृत्य कृत्य; नराधम तरुणाला अखेर पोलिसांकडून अटक

    Pune News: पुण्यातील तरुणींनी प्रेमसंबंधांना नकार देताच त्यांची बदनामी करणाऱ्या विकृत तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

    मूळचा ठाण्याचा, पुण्यातील तरुणींना प्रपोज, नकार येताच विकृत्य कृत्य; नराधम तरुणाला अखेर पोलिसांकडून अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : सोशल मीडियावरून मुलींशी मैत्री करायचा, ओळख वाढली की प्रपोज करायचा आणि समोरच्या मुलीने प्रतिसाद दिला नाही की त्या मुलीच्या नावाचे फेक अकाउंट काढून तिची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करायचा. अशाच पद्धतीने १० ते १५ मुलींना फसवणाऱ्या नराधमाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. रमेश सुरेश म्हात्रे (वय ४०) असं आरोपीचं नाव असून तो मूळ ठाण्याचा रहिवासी आहे. सध्या वसई-विरार परिसरात तो वास्तव्यास असून आरोपी मुलींचा नकार मिळाल्यावर सूड उगवण्यासाठी त्यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून त्या कॉलगर्ल असल्याचा आभास निर्माण करायचा. त्यामुळे संबंधित तरुणींना अश्लील फोन आणि मेसेज येऊ लागायचे.

    या प्रकरणाचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे येथील सायबर पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने केला. कोणताही ठोस धागा नसताना मोबाईल ट्रॅकिंगच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं. नुकतीच त्याला विरार येथून अटक करण्यात आली.

    याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या वाहिनीसोबतही असाच प्रकार केल्यामुळे भावाने घरातून हाकलून दिले होते. त्यानंतर बाहेर वेटर, सेक्युरिटी गार्ड असे मिळेल ते काम तो करत असे. आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक तरुणींचे फोटो सापडले असून घराच्या झडतीत आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आलं आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अशा प्रकारांना बळी पडलेल्या इतर तरुणींनी पुढे येण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

    पुण्यात फसवणुकीची आणखी एक घटना

    “मी इस्रो मध्ये शास्त्रज्ञ आहे” असं सांगत एका इसमाने पुण्यातील २८ वर्षांच्या आयटी इंजिनिअर मुलीची तब्बल ४२ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. लग्नासाठी मॅट्रिमोनियल साइटवर ओळख झाल्यानंतर त्याने सुरुवातीपासूनच स्वतःची मोठी ओळख सांगितली. गोड बोलून विश्वास जिंकला, लग्नाचं आमिष दाखवलं आणि काही बनावट कागदपत्रंही पाठवली. नंतर फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर मुलीने वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा