३ मार्च २०२६ रोजी वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. होळीच्या दिवशीच येणाऱ्या या ग्रहणाचा सुतक काळ, वेळ आणि गर्भवती महिलांसाठीचे नियम काय आहेत? जाणून घ्या सविस्तर
ग्रहणाची वेळ
ग्रहण दुपारी ३:२० वाजता सुरू होऊन सायंकाळी ६:४६ वाजेपर्यंत दृश्यमान राहणार आहे. सुतक काळ सकाळी ६:२० पासून सुरू होऊन ग्रहण समाप्तीपर्यंत राहील. सुतक काळात देवपूजा, अन्नसेवन, झोपणे तसेच शुभकार्य टाळावे, अशी धार्मिक मान्यता आहे.
धार्मिक आचार-विचार
पुरोहित अरुण जंगम यांनी माहिती देताना सांगितले की, ग्रहणकाळात मंत्रोच्चार, नामस्मरण, ध्यान आणि जप करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. या काळात केलेली साधना विशेष फलदायी ठरते. तसेच ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून घराचे शुद्धीकरण करावे आणि दानधर्म केल्यास पुण्यलाभ मिळतो.
Jalna News: इराण–इस्रायल तणाव; जालन्यातील पाच पर्यटकांसह खासदार कल्याण काळे दुबईत अडकले, सरकारकडून समन्वय सुरू
गर्भवती महिलांसाठी सूचना
गर्भवती महिलांनी ग्रहणकाळात विशेष काळजी घ्यावी, असेही जंगम यांनी सांगितले. परंपरेनुसार गर्भवतींनी बाहेर पडणे किंवा धारदार वस्तू वापरणे टाळावे, अशी समजूत आहे.
अन्नसेवनाबाबत धार्मिक मान्यता
ग्रहणकाळात अन्न शिजवणे आणि खाणे टाळण्यामागे धार्मिक कारणे सांगितली जातात. सुतक काळात तयार केलेले अन्न सेवन करू नये, असे शास्त्रात नमूद आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे सुतक सुरू होण्यापूर्वीच अन्न शिजवून ठेवतात किंवा उपवास पाळतात.
खगोलप्रेमींची उत्सुकता
सायंकाळी चंद्रोदयाच्या वेळी ग्रहणाचा अनोखा नजारा पाहायला मिळणार असल्याने खगोलप्रेमी आणि श्रद्धाळू दोघांमध्येही उत्सुकता वाढली आहे. खगोलीय घटना आणि धार्मिक परंपरा यांचा संगम असलेले हे खग्रास चंद्रग्रहण श्रद्धा आणि शास्त्र यांची सांगड घालणारा अनुभव ठरणार आहे.
