Nagpur Explosion: नागपूरमध्ये आज सकाळी स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण दुर्घटना झाल्याने 16 जणांचा बळी गेला असून 24 जण गंभीर जखमी झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून या दुर्घटनेतील मृत्यू झालेल्यांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
राज्य सरकारकडून आर्थिक मदत
जखमींना तातडीने नागपूर येथील एल.एन. हॉस्पिटल, मेडिकल हॉस्पिटल आणि औरेंज सिटी हॉस्पिटल (खामला) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, काटोल यांच्या प्राथमिक अहवालानुसार ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आली आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासन व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून 5 लाख रूपयांच्या मदतीसह संबंधित कंपनी सुद्धा आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबियांना देणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली आहे.
डिटोनेटर तयार करताना स्फोट
स्पेशल ब्लास्ट्स लिमिटेड (SBL) येथे डिटोनेटर तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान स्फोट झाल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. कामगार अंतिम टप्प्यातील क्रिम्पिंग प्रक्रिया करत असताना हा अपघात घडला. डिटोनेटर हे मोठ्या स्फोटकाला स्फोट घडवून आणण्यासाठी वापरले जाणारे उपकरण आहे. त्यामध्ये अत्यल्प प्रमाणात (मिलिग्रॅममध्ये) स्फोटक द्रव्य असते. मात्र उत्पादन प्रक्रियेदरम्यान निष्काळजीपणा किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास धोका संभवतो.
Nagpur Blast: नागपूरमध्ये सकाळी भीषण स्फोट, दुर्घटनेत 15 कामगारांचा मृत्यू; अनेक कर्मचारी इमारतीच्या ढिगार्याखाली अडकले
कसा झाला अपघात?
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्फोट झालेले डिटोनेटर हे नॉन-इलेक्ट्रिक प्रकारातील होते. या प्रकारात विद्युत प्रवाहाऐवजी धक्क्यामुळे (शॉक इफेक्ट) स्फोट होतो. सरकारने पारंपरिक इलेक्ट्रिक डिटोनेटरवर बंदी घातली आहे. हे डिटोनेटर विद्युत प्रवाह गेल्यावर त्वरित स्फोट घडवू शकत असल्याने ते अधिक धोकादायक मानले जात होते. तसेच अशा उपकरणांचा गैरवापर माओवादी किंवा इतर दहशतवादी गटांकडून होऊ शकतो, अशीही भीती व्यक्त करण्यात आली होती.
सध्या उद्योग क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर वापरले जातात. या प्रकारात स्फोट घडवण्यासाठी विशेष ‘लॉगर’ उपकरण आवश्यक असते. संबंधित कंपनीच्या सुसंगत लॉगरशिवाय डिटोनेटर सक्रिय होत नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, SBLचे डिटोनेटर केवळ कंपनीच्या अधिकृत लॉगरद्वारेच कार्यान्वित होतात. कंपनीकडून दोन्ही प्रकारचे डिटोनेटर तयार केले जातात. संबंधित डिटोनेटर औद्योगिक वापरासाठी बनवले जात होते, लष्करी दारुगोळ्यासाठी नव्हे, असे स्पष्ट करण्यात आले.
