• Fri. Mar 6th, 2026
    Solapur Crime : प्रेमसंबंधांच्या संशयातून बापानेच लेकीला संपवलं, पुरावे नष्ट करण्यासाठी संतापजनक कृत्य; दोन महिन्यानंतर मृत्यूचा उलगडा

    Solapur Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच सोलापुरात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं शहरात संतापाची लाट उसळली आहे.

    वैराग प्रेमसंबंधातून वडिलांनी मुलीला मारलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर : प्रेमसंबंधांच्या संशयातून बापाने पोटच्या मुलीची गळा आवळून तिची हत्या केली आहे. सोलापुरात ऑनर किलिंगसदृश घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. बार्शी तालुक्यातील वैराग येथील रुई येथून ही मोठी घटना घडली आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून आरोपी बापानेच आपल्या 17 वर्षीय पोटच्या लेकीचा गळा आवळला आहे. मुलीची हत्या केल्यानंतर आत्महत्येचा बनाव करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न बापाने केला होता. संशयित आरोपी बापाचा हा प्रयत्न निष्फळ ठरला. वैराग पोलिसांच्या तांत्रिक तपासाने ही ऑनर किलिंगची घटना उघड झाली आणि आरोपी वडिलांना न्यायालयाने 2 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. राजेंद्र लालासाहेब नरसुडे (वय 54) असं संशयीत आरोपी बापाचं नाव आहे.

    मुलीचे प्रेमसंबंध असल्याची बापाला कुणकुण

    राजेंद्र नरसुडे याची मुलगी ही बार्शी येथे शिक्षण घेत होती. तिचे कॉलेजमधील एका तरुणाशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याची कुणकुण वडील राजेंद्र नरसुडे याला लागली. राजेंद्र नरसुडे याने 27 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 ते 12:30च्या सुमारास घरातच मुलीचा तिच्याच ओढणीने गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर पुरावे लपवण्यासाठी त्याने तिला बळजबरीने कीटकनाशक पाजले, मोबाईलमधील चॅट्स डिलीट केल्या आणि धाराशिव रुग्णालयात नेले. धाराशिव येथील डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित केले.
    Maharashtra TimesChembur Accident: चेंबूरमध्ये सहाव्या मजल्यावरून सहा कामगार पडले, दुर्घटनेत 55 वर्षीय कामगाराचा बळी; एकाची स्थिती गंभीर

    शवविच्छेदन अहवालावरून तपासाची चक्रे फिरली

    बार्शी तालुक्यातील वैराग पोलीस ठाण्यात तरुणीची आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. धाराशिव शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्यानंतर अहवालात गळा आवळल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदेश पवार यांच्या नेतृत्वात सखोल तपास सुरू झाला. सायबर तज्ज्ञांनी डिलीट डेटा रिकव्हर करत संशय बळकट केला. राजेंद्र नरसुडे याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच राजेंद्र याने गुन्हा कबूल केला. हवालदार संदेश पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. ऑनर किलिंगसारख्या घटनेमुळे वैराग परिसरासह सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा