• Thu. Mar 12th, 2026
    Satara News : सातारा-पंढरपूर मार्गावर रानगव्याचा धुमाकूळ, वृद्ध शेतकऱ्यावर हल्ला

    सातारा-पंढरपूर मार्गावर रानगव्याने धुमाकूळ घातल्याची घटना घडली. या रानगव्याने एका वृद्ध शेतकरीवर हल्ला केला. या हल्ल्यात वृद्ध शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : सातारा-पंढरपूर मार्गावरील कोकरेवाडी आणि विडणी परिसरात शुक्रवारी (27 फेब्रुवारी) सकाळी रानगव्याने धुमाकूळ घातला. रानगव्याच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी गंभीररित्या जखमी झाला आहे. त्यांच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजेंद्र सदाशिव जाधव, असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गवा दिसताच लोक सैरावैरा पळत होते. वन विभागाकडून गव्याला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

    फलटण तालुक्यातील कोकरेवाडी तसेच विडणी परिसरातील सातारा-पंढरपूर मार्गावर सकाळी लोकांना रानगवा फिरताना दिसला. बिथरल्याने तो नागरीकांवर हल्ला करण्यासाठी धावून जात होता. सायकलवरून आलेल्या राजेंद्र जाधव या वृद्ध शेतकऱ्याचा पाठलाग करत रानगव्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ते रक्तबंबाळ झाले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने बारामतीला नेण्यात आले. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

    या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत रानगवा रस्त्यावर फिरताना दिसतोय. यावेळी सायकलवर आलेले राजेंद्र जाधव हे स्वत:ला वाचवण्यासाठी रानगव्यापासून दूर जात होते. त्यांनी सायकल जमिनीवर टाकून जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला. पण रानगव्याने त्यांच्या पाठिमागे धावत त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते प्रचंड जखमी झाले आहेत.

    या घटनेनंतर गावचे सरपंच सागर अभंग आणि डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ घटनेची माहिती दिली. तसेच रानगव्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली. परंतु, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘आम्ही गव्याला पकडू शकत नाही, फक्त हाकलू शकतो’, असे हतबल उत्तर दिले. मात्र, रानगवा लोकवस्तीत आल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत वन विभागाने रानगव्याला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू केले.

    नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. शेतात जाताना समूहाने जावे आणि गव्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान, रानगवा कुठून आला, हा प्रश्नही उपस्थित झाला. त्यावर खुलासा करताना फलटणचे वन क्षेत्रपाल दिगंबर जाधव म्हणाले की, खंडाळा, कोरेगाव, पुसेगाव भागातील डोंगरी भागात रानगवे आढळून येतात. त्या ठिकाणच्या कळपातील हा रानगवा पाण्याच्या अथवा चाऱ्याच्या शोधात आला असावा. कळपातून बाजूला झाल्यामुळे तो बिथरला असेल. नागरीकांनी सतर्क राहावे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा