• Wed. Mar 11th, 2026
    Solapur News: मम्मी-पप्पा उठत का नाहीत? तोंडाला फेस पाहून मुली हादरल्या; सोलापुरात पती-पत्नीचा रहस्यमय मृत्यू

    सोलापूरच्या कलावती नगर भागात पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आई-वडील उठत नसल्याचे आणि त्यांच्या तोंडाला फेस आल्याचे पाहून लहान मुलींनी काकांना फोन केला. अन्..

    सोलापूरमध्ये पती-पत्नीचा रहस्यमय मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर : सोलापूर शहरात एक धक्कादायक आणि रहस्यमय घटना समोर आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत्या घरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले आहेत. सोमनाथ धानोप्पा पाटील (वय ४०) आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील (वय ३५, दोन्ही रा. कलावती नगर, एमआयडीसी पोलीस ठाणे हद्द, सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. हे पती-पत्नी रात्री आपल्या दोन मुलींसह जेवण करून झोपी गेले होते. शुक्रवारी सकाळी दोघांच्याही तोंडातून फेस येत असल्याचे दिसून आले. आई-वडील उठत नाहीत आणि त्यांच्या तोंडाला फेस आला आहे, हे पाहून दोन्ही मुली घाबरल्या. त्यांनी तातडीने आपल्या काकांना फोन करून या घटनेची माहिती दिली. काकांनी भाऊ आणि भावजयीला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पती-पत्नीने आत्महत्या केली की हा घातपात आहे? याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

    शुक्रवारी सकाळी बेशुद्ध अवस्थेत आढळले

    सोलापूर शहरातील कलावती नगर भागात ही धक्कादायक घटना घडली. सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील हे मूळचे शिरवण (ता. दक्षिण सोलापूर) येथील रहिवासी होते, मात्र सध्या ते कलावती नगर येथे राहत होते. शुक्रवारी, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सहाच्या सुमारास हे दोघे बेशुद्ध अवस्थेत आढळले. तोंडातून फेस येत असल्याने त्यांना तातडीने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

    मुलींनी काकांना केला फोन

    घटनेच्या वेळी मृत पती-पत्नीसोबत त्यांच्या दोन मुली घरात होत्या. आई-वडील उठत नाहीत आणि त्यांच्या तोंडाला फेस आला आहे, हे दृश्य पाहून मुलींनी तातडीने काकांना फोन केला. काकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांना रुग्णालयात नेले, पण उशीर झाला होता.

    Maharashtra TimesPandharpur News: वाढदिवसाच्या शॉपिंगला दुचाकीने जात होते, मध्येच नको ते घडलं, बारावीच्या दोन विद्यार्थ्यांचा अपघातात करुण अंत

    सोमनाथ पाटील यांचा पूर्वी कुक्कुटपालनाचा व्यवसाय होता, त्यानंतर त्यांनी घरातच किराणा दुकान सुरू केले होते. पती-पत्नी दोघे मिळून हे दुकान चालवत असत.

    सुसाईड नोट सापडल्याची प्राथमिक माहिती

    या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घटनास्थळी एक चिठ्ठी (सुसाईड नोट) सापडल्याचे बोलले जात आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. ही आत्महत्या आहे की यामागे दुसरे काही कारण आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा