• Fri. Mar 6th, 2026

    बँक खात्यात तब्बल 2 कोटी 60 लाख आले, अनभिज्ञ तरुणीची पोलिसात धाव; डोंबिवलीत एकच खळबळ

    बँक खात्यात तब्बल 2 कोटी 60 लाख आले, अनभिज्ञ तरुणीची पोलिसात धाव; डोंबिवलीत एकच खळबळ

    Crime News: डोंबिवलीत एका तरुणीच्या बँक खात्यात तब्बल २ कोटी ६० रुपये जमा झाल्याच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणीनं पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे: एका विद्यार्थिनीच्या बँक खात्यात तब्बल २ कोटी ६० लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणीच्या खात्यात २ कोटी ६० रुपये जमा झाल्यानं एकच खळबळ उडाली. खात्यातील रकमेचा आकडा पाहून तरुणीचे डोळे विस्फारले. त्यानंतर तिनं पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणात पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप आहे.

    या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एन्ट्री घेतल्यानं सगळ्या विषयाला राजकीय वळण मिळालं आहे. मनसेकडून पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. डोंबिवली गोग्रासवाडी भागात राहणारी निधी तिवारी ही विद्यार्थिनी कल्याणमधील महाविद्यालयात एमएस्सीचं शिक्षण घेते. निधीची मैत्रीण चांदनी सिंह आरबीएल बँकेत काम करते. आपल्याला बँक खाती उघडण्याचं टार्गेट असल्याचं सांगून चांदनीनं निधीची ओळखपत्रं, कागदपत्रं घेतली आणि तीन वेगवेगळ्या बँकेत तिची खाती उघडली.

    खातं उघडण्यासाठी निधीनं चांदनीला काही पैसेदेखील दिले. यानंतर काही दिवसांनी निधीला तिच्या खात्यातून २ कोटी ६० लाख रुपये आणि दुसऱ्या खात्यामधून १० लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचं कळलं. यामुळे तिला जबर धक्का बसला. निधीनं याबद्दल चांदनीकडे विचारणा केली असता तिनं उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे निधीनं स्वत: या प्रकरणातील सत्य शोधण्याचा प्रयत्न सुरु केला.

    उत्तराखंडमधील सर्वसामान्य लोकांची फसवणूक करुन त्यातून मिळालेला पैसा निधीच्या खात्यात वळवण्यात आला होता. या सगळ्या रॅकेटमध्ये उल्हासनगरमधील एका व्यक्तीचा समावेश असल्याचं समोर आलं. त्यामुळे निधीनं या सगळ्याची माहिती पोलिसांना दिली. गेल्या ३ महिन्यांपासून निधी पोलीस ठाण्यात खेटे घालत आहेत. पण पोलिसांनी अद्याप तरी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असा तिचा आरोप आहे.

    पोलीस दाद देत नसल्याचं पाहून निधीनं मनसेचे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली आणि सगळा प्रकार त्यांच्या कानावर घातला. मुख्यमंत्री सायबर गुन्हे रोखण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करतात. मग एका विद्यार्थिनीसोबत इतका मोठा गैरप्रकार घडूनही त्यासंदर्भात कारवाई का करत नाहीत, असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला. संशयित आरोपीला पोलीस ठाण्यात बोलावलं आणि कारवाई न करता का सोडून दिलं, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा