• Thu. Sep 10th, 2026

उमेद मार्ट उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कॉच अवॉर्ड’ – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Feb 26, 2026
उमेद मार्ट उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कॉच अवॉर्ड’ – महासंवाद

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि पदार्थांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता उमेद मार्ट या ऑनलाईन प्लॅटफॉर्म (ई-मार्केट प्लेस) ची सुरुवात करण्यात आलेली आहे. या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेचा असा स्कॉच अवॉर्ड  नुकताच घोषित झाला.

उमेद मार्ट  ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म

उमेद अभियानाकडून राज्यभरातील स्वयंसहायता गटाच्या महिलांना रोजगार मिळावा, त्या उद्योजिका व्हाव्यात, यासाठी सातत्याने वैविध्यपूर्ण प्रयत्न केले जातात. तालुका ते राज्यस्तरीय प्रदर्शन भरविणे, तात्पुरते किंवा कायमस्वरूपी विक्री केंद्र उभे करणे यासारखे उपक्रम आयोजित केले जातात. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून उमेद अभियानाने मागील वर्षी उमेद मार्ट हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार केला आणि त्यावर महिलांचे विविध उत्पादने अपलोड करण्यात आली.

सद्यस्थितीत उमेद मार्टवर ४२०० पेक्षा जास्त उत्पादने

सद्यस्थितीत उमेद मार्ट वर ४२०० पेक्षा जास्त उत्पादने उपलब्ध आहेत. या प्लॅटफॉर्ममुळे देशभरातील किंवा जगभरातील शहरी ग्राहकांना ग्रामीण बाजाची आणि अस्सल चवीची उत्पादने  स्वतःच्या घरात बसून उपलब्ध होण्याची सोय झालेली आहे. उमेद मार्टची सुरुवात होऊन उणीपुरी दोन वर्ष होत आहेत. या पोर्टलची सुरुवात केल्यानंतर उत्पादने अपलोड करणे, दर्जेदार पॅकेजिंग, वाजवी किंमतीची निश्चिती करणे या बाबी ग्रामीण भागातील महिलांना सहज करता याव्यात यासाठी राज्यभर प्रशिक्षणे देण्यात आली असून हा उपक्रम देशभर पोहचत आहे. देशभरातून आणि जगाच्या काही प्रमुख शहरातून ग्रामीण महिलांची उत्पादने मागविली जात आहेत.

आतापर्यंत सुमारे साडेपाच कोटींची विक्री

या उमेद मार्टच्या माध्यमातून साधारण साडेपाच कोटी एवढी विक्री सुद्धा झालेली आहे. वितरण व्यवस्था सुरळीत आणि कालबद्ध व्हावी म्हणून राज्यातील सातारा, सिंधुदुर्ग, जालना, कोल्हापूर, लातूर, अमरावती, भंडारा आणि नाशिक या शहरांमध्ये उमेद मार्टचे एकत्रीकरण केंद्रे आणि विक्री केंद्र उभे करण्यात आलेली आहेत.  या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील स्वयंसहायता गटाच्या महिलांना आपल्या उत्पादनांची विक्री करण्याची सोय झालेली आहे.

दिल्ली येथे २८ मार्च रोजी होणार स्कॉच अवॉर्डचे वितरण

या उपक्रमाची स्कॉच फाऊंडेशन दिल्ली या नामांकित संस्थेने दखल घेऊन यावर्षीच्या राष्ट्रीय स्तरावर अत्यंत प्रतिष्ठेचा असलेल्या स्कॉच अवॉर्ड साठी घोषणा केली आहे. हा पुरस्कार २८ मार्च २०२६ रोजी दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. या पुरस्काराच्या घोषणेनंतर अभियानातील ग्रामीण महिलांच्या कामाचा हा सन्मान असल्याची भावना उमेद अभियानाशी निगडीत राज्यभरातील सर्वांची  झालेली आहे.

00000

वंदना थोरात/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed