नेमकं काय झालं?
मंगळवारी पहाटे झालेल्या दुर्घटनेत मारुती व्हॅन आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये वाहनचालक नितीन कोकाटे (वय २२, रा. काष्टी ता. श्रीगोंदा), गजानन जनार्दन पायघन (वय ४७), दुर्पा गजानन पायघन (वय ३६) आणि वैभव गजानन पायघन (वय १९, सर्व मूळ रा. पातूर, जि. अकोला, सध्या रा. चिंबळे, ता. श्रीगोंदा) हे ठार झाले आहेत, तर करण गजानन पायघन (वय १४) हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गावाजवळच काळाचा घाला
पायघन कुटुंब कामासाठी श्रीगोंदा तालुक्यात वास्तव्यास आले आहे. दोन दिवसांपूर्वी ते चालक कोकाटे याला सोबत घेऊन अकोला जिल्ह्यातील मूळ गावी गेले होते. तेथून परत येत असताना इकडच्या गावाच्या अगदी जवळ आले असता त्यांना हा अपघात झाला. अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. अपघातानंतर ट्रकचालक वाहन सोडून पळून गेला.
अपघाताची माहिती समजताच बेलवंडी पोलिस ठाण्याचे नंदकुमार सोनवळकर आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. जखमीला रुग्णालयात नेण्यात आले. मृतदेह श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
लग्नाच्या तोंडावर मृत्यू
या अपघातात ठार झालेले वाहनचालक नितीन कोकाटे यांचे अलीकडेच लग्न ठरले होते. लग्न होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. कुटुंबाची उपजीविका चालविण्यासाठी पायघन कुटुंबासह श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे गावात स्थलांतरित झाले होते. पायघन यांना वैभव आणि करण अशी दोन मुले होती. अपघात मोठा वैभव ठार झाला. गंभीर जखमी झालेला करण एकटाच कुटुंबात उरला आहे. अपघाताची माहिती त्यांच्या नातेवाइकांना कळविल्यानंतर ते नगरकडे येण्यासाठी निघाले.
अजित दादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, माझी वसुंधरा सन्मान सोहळ्यात सुनेत्रा पवारांचं भाषण