• Sat. Mar 7th, 2026
    Latur News : गाडीच्या नुकसानीचा संशय अन् 32 मुलांवर तुटून पडला शिक्षक; अहमदपूरच्या नामांकित शाळेतील संतापजनक प्रकार

    लातूरच्या अहमदपूर येथील प्रसिद्ध शाळेमध्ये ३० ते ३२ विद्यार्थ्यांना वेळूच्या काठीने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीच्या नुकसानीच्या संशयावरून आरोपी उज्वल सोनीने हे कृत्य केले असून…

    शिक्षणाच्या पंढरीत चिमुकल्यांवर अमानुष अत्याचार.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ऋषिकेश होळीकर, लातूर : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुका हा ‘शिक्षणाची पंढरी’ म्हणून ओळखला जातो. मात्र, याच पंढरीला आणि पवित्र अशा शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना थोरलेवाडी येथे घडली आहे. एका प्रसिद्ध शाळेच्या हॉस्टेलमधील तब्बल ३० ते ३२ चिमुकल्या विद्यार्थ्यांना वेळूच्या काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. हा प्रकार ज्या कारणावरुन घडले आहे ते कारणही आता प्रचंड चिड आणणारे असल्याचे समोर आले आहे.

    गाडीचे नुकसान का केलात म्हणत काठाने मारहाण

    पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास संबंधित स्कूलच्या हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला आहे. आरोपी उज्वल प्रकाश सोनी (रा. बैतुल, मध्य प्रदेश) याला आपल्या मोटारसायकलचे नुकसान हॉस्टेलमधील मुलांनीच केले असल्याचा संशय होता. या शुल्लक कारणावरून त्याने संयम गमावला आणि ३० ते ३२ विद्यार्थ्यांना अश्लील शिवीगाळ करत वेळूच्या काठीने अमानुष मारहाण केली.विशेष म्हणजे, मारहाण करताना त्याने “मी या शाळेचा प्राचार्य होणार आहे, तेव्हा तुम्हाला बघून घेतो,” अशी धमकीही विद्यार्थ्यांना दिली. ज्या शिक्षकी पेशाकडे समाज मार्गदर्शक म्हणून बघतो, त्याच पदाची स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे क्रूर कृत्य घडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

    Maharashtra TimesRajya Sabha Election: राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा निर्णय झाला, भाजपमधून दिग्गज नेत्याचं कमबॅक होण्याची शक्यता, कोणती नावे चर्चेत?

    प्राचार्यांनी दिली तक्रार

    याप्रकरणी शाळेचे प्राचार्य जैबाबेरला प्रपीन नाडर (वय ४२) यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी उज्वल सोनी विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS २०२३: कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) (३). बालन्याय अधिनियम २०१५: सह कलम ७५. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.

    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar News : गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या, 28 वर्षीय महिलेला पडलं महागात; अतिरक्तस्रावाने हृदयद्रावक अंत

    अहमदपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. जखमी विद्यार्थ्यांनी उपचार घेतल्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली.

    विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ‘शिक्षणाच्या पंढरी’त घडलेल्या या घटनेमुळे सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा