मुंबई महापालिकेतील विविध समित्यांवर अध्यक्ष, सदस्यांची निवड झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवकपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. यामध्ये आपल्या नातेवाइकांना स्थान मिळण्यासाठी काही नेत्यांची धडपड सुरू आहे. भाजप आमदार राजहंस सिंह यांचे पुत्र नितेश सिंह, शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. यासाठी त्यांनी अर्जही दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.स्वीकृत नगरसेवक सदस्यपदासाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत. त्यातील काही नावांवर शिक्कामोर्तबही झाल्याची माहिती आहे. भाजपकडून माजी नगरसेवक प्रवीण छेडा, प्रतिप कर्पे, कमलाकर दळवी यांना संधी दिली जात असून भाजप आमदार राजहंस सिंह यांचे पुत्र नितेश सिंह यांचीही वर्णी लागणार असल्याचे समजते. शिवसेना (उबाठा) पक्षाकडून कैलास पाठक, माधुरी मांजरेकर आणि साईनाथ दुर्गे यांची नावे आघाडीवर आहेत. महापालिका निवडणुकांच्या वेळी माधुरी मांजरेकर यांना वडाळा येथील प्रभाग क्रमांक १७८मधून शेवटच्या क्षणी तिकीट नाकारण्यात आले होते.काँग्रेसकडून माजी नगरसेवक वीरेंद्र चौधरी यांना संधी देण्यात येईल. चौधरी हे आमदार अस्लम शेख यांचे निकटवर्तीय मानले जातात. शिवसेनेच्या वाट्याला दोन स्वीकृत सदस्यत्व आले आहेत. यामध्ये माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रिद आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे यांची निवड होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. महापालिका निवडणुकांच्या वेळी राज सुर्वे यांचे तिकीट ऐनवेळी कापण्यात आले होते. त्यामुळे प्रकाश सुर्वे नाराज होते. मात्र ‘स्वीकृत’द्वारे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मुंबई महापालिका अधिनियमाच्या कलम पाच (एक) (ब)नुसार १० नामनिर्देशित सदस्य, तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम पाच (दोन) (ब)नुसार १० टक्क्यांपेक्षा जास्त किंवा १० सदस्य यापैकी जे कमी असेल, इतकेच स्वीकृत नगरसेवक नेमता येतात. स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती महापालिकेच्या आयुक्तांच्या शिफारशीवरून आणि सभागृहाच्या संमतीने होते. अंतिम नियुक्ती महापौरांच्या शिफारशीवरून राज्य सरकार करते.सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या राजकीय पक्षाला जास्त जागा मिळतात. त्यासाठी महापालिकेने कोटा व सूत्र निश्चित केलेले असते. त्यानुसार एकूण दहा स्वीकृत नगरसेवकांपैकी भाजपला चार स्वीकृत नगरसेवक मिळाले आहेत. तर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वाट्याला तीन, काँग्रेसला एक सदस्य मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, शिवसेनेने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत संयुक्त गट स्थापन केल्याने त्यांच्या वाट्याला दोन स्वीकृत सदस्य आले आहेत. संयुक्त गट स्थापनेमुळे एमआयएमला मिळणारे स्वीकृत सदस्यत्व कमी झाले आहे.
साईनाथ दुर्गे यांच्या नावाला विरोध
साईनाथ दुर्गे यांच्या नावावर शिवसेना पक्षाकडून विरोध करण्यात आला आहे. शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्याबाबतची ध्वनिचित्रफित प्रसारित केल्याच्या प्रकरणात दहिसर पोलिसांनी कारवाई करत दुर्गे यांना मार्च २०२३मध्ये अटक केली होती. दुर्गे हे माजी शिक्षण समिती सदस्यही राहिले आहेत. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.