राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील हे आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीने भावूक झाले. मुंबईच्या वरळी डोम येथे आयोजित शोकसभेत भाषण करताना जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले.
जयंत पाटील काय-काय म्हणाले?
“गेले जवळपास 38 वर्षे आम्ही एकत्रित काम केलं. क्लासमेट म्हटलं की, दहा-बारा वर्षींची साथ असते. पण मला आठवतं 1991 पासून आम्ही विधानसभेच्या एका वर्गात जवळपास शेजारी-शेजारी बसायचो. 1914 पासून तर शेजारी बसण्याचे प्रसंग अनेकदा आले. अजित दादांचे अनेक पैलू आम्ही सगळ्यांनी जवळून पाहिले. माझ्याकडे तर प्रचंड आठवणी आहेत. खुल्या मनाचा, दिलदार मनाचा आणि विरोध करायचा असेल तर ठामपणाने करणारा नेता म्हणून आम्ही अजित दादांना अनुभवलं.””राजकारणात गोड बोलावं लागतं, सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं. असं मी त्यांना नेहमी सांगायचो. ते म्हणायचे, गोड बोलायचं मला जमत नाही. तो तुमचा मार्ग आहे. मी जे आहे तेच सांगणार. एखाद्या मीटिंगच्या आधी सांगितलं की, हे आमक्या जिल्ह्यातील तालुक्याचे येत आहेत, थोडं शांतीने घेऊ आणि मग हाताळू. मला सांगायचं आहे, ते मी आताच सांगणार. एवढा ठामपणा मी महाराष्ट्रातल्या, देशातल्या कुठल्याही नेत्यात बघितला नाही. जे असेल ते समोर आणि रोखठोक म्हणून अजित दादांबद्दल एक घोषणा असायची. एकच वादा, अजित दादा. ते खरंच होतं. महाराष्ट्रातील सगळीकडे जनतेला ही खात्री असायची आणि म्हणून जनता ही घोषणा द्यायची.”
“अजित दादांचं महाराष्ट्राचं घडवण्याचं आणि महाराष्ट्रातलं राजकारण घडवण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी हळूहळू पुन्हा मैदान तयार करावं, हळूहळू संघटना आणखी जोरदारपणे पुन्हा वाढवावी आणि एकसंघपणाने अधित ताकदीने काम करावं या विचारांचं स्वप्न होतं. हे स्वप्न पाहत असतानाच नियतीने मोठा घात केला.”
“मी दादांना अलिकडच्या काळात फार जवळून पाहिलं. प्रचंड महत्त्वकांक्षी आणि कुठल्याही आव्हानाला तोंड देण्याची मानसिकता असणारे दादा मी फार जवळून बघितले. त्यामुळे मला असं म्हणावं लागतंय की, प्रचंड मोठ्या महत्त्वकांक्षेची राखरांगोळी झाली. आज अजित पर्वाचा अस्त झाला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं म्हणजे वाऱ्यासारखा महाराष्ट्रभर फिरणारा दादा एका क्षणात शांत कसा झाला? हे आजही महाराष्ट्राला कोडं आहे.”
“अजित दादांना टापटिप आवडायची. पण व्यक्तीगत संबंध अजित दादा फार सुरेख सांभाळायचे. मी पक्षाचा अध्यक्ष असताना अनेक असे प्रसंग आहेत, एखाद्या मतदारसंघात एखादी गोष्ट करायची असेल तरी दादांचा फोन यायचा. मतभेद झाले तरी मला हेच वाटतं असं सांगून फोन ठेवायचे. स्वत:चं मत मांडायला दादा कधी कचरले नाहीत.”
“आम्ही एका पक्षात फार वर्षे काम केलं. काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली. शरद पवार यांचे प्रचंड मोठे त्यांच्यावर संस्कार होते. मी अलिकडच्या काळात फार जवळून बघितलं की, शरद पवारांचं त्यांच्यावर प्रचंड प्रेम होतं. आजही शरद पवारांचा हुकमी एक्का अजित पवारच होते. एवढा अजित पवारांच्या कामगिरीवर शरद पवारांचा विश्वास होता.”
